Farmer Incentive Scheme : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 मध्ये तत्कालीन सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारने नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा देखील केली होती.
50000 पर्यंतचे अनुदान नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलं जाईल अशी घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळी करण्यात आली. मात्र कोरोना आणि मध्यंतरी झालेले सत्तांतर यामुळे हा निर्णय गेल्या सरकारच्या काळात अंमलबजावणी पर्यंत पोहोचू शकला नाही. परंतु सत्ता बद्दल होऊन राज्यात आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने हा निर्णय कायम ठेवला.
या अनुषंगाने 4700 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आली. जानेवारी 2023 पर्यंत या योजनेसाठी 3700 कोटी रुपये शासनाकडून वितरित देखील झाले. दरम्यान आता फेब्रुवारी 2023 मध्ये या योजनेअंतर्गत तरतूद केलेल्या आणि शिल्लक राहिलेला 1000 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान आता याच योजनेस संदर्भात नांदेड जिल्ह्यातून एक मोठी माहिती हाती येत आहे.
जिल्ह्यातील 9321 शेतकऱ्यांना 36 कोटी 58 लाख रुपयांचा लाभ या ठिकाणी देऊ करण्यात आला आहे. मात्र या योजनेअंतर्गत पात्र असलेले तीस हजार शेतकरी जिल्हाभरात अजूनही वंचित आहेत. परंतु आता या योजनेसाठी संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी एक हजार कोटींच्या निधी वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याने नांदेड जिल्ह्यातील उर्वरित तीस हजार शेतकऱ्यांना देखील लवकरच या योजनेअंतर्गत 50000 पर्यंतच्या अनुदानाचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेत नांदेड जिल्ह्यातील ६२ हजार ५०४ पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेच्या माध्यमातून अपलोड झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी ३२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकासह याद्या प्रसिद्ध देखील झाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे विशिष्ट क्रमांकासह यादीत नाव आले आहे अशा शेतकऱ्यांना आधार प्रामाणिकरण झाल्यानंतर योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे. या परिस्थितीत जिल्ह्यातील ३० हजार ७२० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे.
तर दोन हजार १७९ शेतकरी आधार प्रमाणिकरणाचे बाकी आहेत. दरम्यान आतापर्यंत आधार प्रमाणिकरण झालेल्या नऊ हजार ३२१ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन लाभाचे ३६ कोटी ५८ लाख रुपये जमा झाल्याची माहिती उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील उवर्रित २४ हजार ४९६ शेतकऱ्यांच्या खत्यावर लवकरच या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी तालुकास्तरीय समिती तसेच जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या शेतकऱ्यांनी तालुका सहनिबंधक कार्यालयाकडे संपर्क करुन कागदपत्राची पुर्तता करावी, असे आवाहन देखील जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून करण्यात आले आहे. निश्चितच, नांदेड जिल्हा प्रमाणेच राज्यातील इतरही जिल्हातील पात्र शेतकऱ्यांना लवकरच या योजनेअंतर्गत 50000 पर्यंतच प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. एकंदरीत प्रोत्साहन अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.