स्पेशल

काय सांगता ! ‘या’ योजनेसाठी शासन आता शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणार; एकरी देणार ‘इतके’ लाख, वाचा सविस्तर

Published by
Ajay Patil

Farmer Scheme : शेतकऱ्यांचे, कष्टकरी शेतमजुरांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून नानाविध अशा योजना सुरू केल्या जातात. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही स्कीम राज्यातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील शेतमजुरांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची राज्य शासनाची योजना आहे.

या योजनेअंतर्गत एस सी कॅटेगिरी मधील दारिद्र्यरेषेखालील शेतमजुरांना शासनाकडून शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते. शेतमजुरांना आपले आयुष्य समाधानाने घालवता यावे त्यांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध व्हावे यामुळे त्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हेतू या योजनेअंतर्गत शेतजमीन शासनाकडून दिली जाते. विशेष म्हणजे या शेतमजूर लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर ही जमीन उपलब्ध होते.

योजनेअंतर्गत लाभार्थीला दोन एकर बागायती आणि चार एकर जिरायती जमीन उपलब्ध करून दिली जाते. दरम्यान आता कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी केल्या जाणार आहेत आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला या जमिनी दिल्या जाणार आहेत.

यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी ज्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनी शासनाला द्यायच्या असतील त्यांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या ठिकाणी एक गोष्ट विशेष ध्यानात घेण्यासारखी ती म्हणजे शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनी ह्या शासकीय दरात म्हणजेच रेडी रेकनर नुसार खरेदी केल्या जातील.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतमजुरांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेअंतर्गत शेतजमीनीचा लाभ देण्यासाठी समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे. मात्र जमीन ही शेती करणे योग्य असणे गरजेचे राहणार आहे. म्हणजे जमीन कसण्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्राजवळच्या क्षारयुक्त व क्षारपड जमीन समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून खरेदी केल्या जाणार नाहीत.

जमिनीला इतका मिळणार दर

ज्या शेतकऱ्यांना आपली सलग जमीन शासकीय दरात विक्री करायची असेल त्या शेतकऱ्यांनी जमिनीचा सात-बारा व आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा अस आवाहन केलं जात आहे. शासकीय दरात शेतजमीन खरेदी होणार आहे म्हणजेच जिरायती जमिनीला कमाल पाच लाख रुपये एकरी आणि बागायतीत जमिनीला कमाल आठ लाख रुपये एकरी इतकाच भाव मिळणार आहे.

दरम्यान शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनी त्याच गावातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दिल्या जातील. जर त्या गावात पात्र लाभार्थी उपलब्ध नसतील तर शेजारील गावातील पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल आणि जर शेजारीही पात्र लाभार्थी उपलब्ध नसतील तर तालुकास्तरावरील पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल असे सांगितले जात आहे.

Ajay Patil