Farmer Success Story : अलीकडे शेतीचा व्यवसाय हा मोठा आव्हानात्मक बनला आहे, यात शंकाच नाही. मातीत पेरलेलं उगवेल याची शाश्वती राहिलेली नाही. मात्र असंख्य संकटे मार्गावर असतानाही शेतकऱ्यांनी शेती करणे सोडलेले नाही. किंबहुना असंख्य संकट असतानाही शेतकरी बांधव शेतीमध्ये नेहमीच काहीतरी नवीन प्रयोग अंमलात आणत असतात.
महत्त्वाचे म्हणजे या नवनवीन प्रयोगातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होते. दरम्यान, असाच एक कौतुकास्पद प्रयोग दुष्काळग्रस्त तालुका म्हणून कुख्यात असलेल्या जत तालुक्यातुन समोर आला आहे.
जत तालुक्यातील माडग्याळ येथील प्रयोगशील तरुण शेतकरी दशरथ सावंत यांनी दुष्काळी परिस्थिती असतानाही डाळिंब बागेतून लाखो रुपयांची कमाई केली आहे. सावंत यांनी आपल्या दीड एकर डाळिंब बागेतून यंदा तब्बल 12 लाख रुपयांची कमाई काढली आहे. यामुळे, सध्या सावंत यांच्या या प्रयोगाची पंचक्रोशीत विशेष चर्चा सुरू आहे.
दशरथ सावंत यांनी आपल्या दीड एकर जमिनीत गणेश जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. या दीड एकर डाळिंब बागेतून गेल्या वर्षी त्यांना आठ लाख रुपयांची कमाई झाली होती. खर्च कमी असतानाही त्यांना गेल्या वर्षी चांगले उत्पन्न मिळाले होते.
यंदाही त्यांनी डाळिंब बागेसाठी कमी खर्च करून अधिकचे उत्पन्न मिळून दाखवले आहे. सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत त्यांना दोन टप्प्यात आठ टन डाळिंब उत्पादन मिळाले आहे. या उत्पादित झालेल्या डाळिंबाला 110 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला आहे.
या डाळिंब विक्रीतून त्यांना आत्तापर्यंत आठ लाख 80 हजार रुपयांची कमाई झाली असून आणखी चार ते पाच लाख टन माल शिल्लक आहे. त्यातून त्यांना अंदाजित 12 ते 13 लाख रुपयांची कमाई होणार आहे. दीड एकर डाळिंब बाग जोपासण्यासाठी आणि फुलवण्यासाठी त्यांना आतापर्यंत तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे.
यामुळे हा संपूर्ण खर्च वजा करून त्यांना यंदाच्या हंगामातून गणेश जातीच्या डाळिंब बागेतून तब्बल दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा राहणार आहे. सावंत यांनी यंदा जूनच्या सुरुवातीला डाळिंब बागेची छाटणी केली. पाण्याची उपलब्धता पाहून त्यांनी छाटणीचे नियोजन केले होते.
बागेची छाटणी केल्यानंतर, वेळोवेळी इतर प्रयोगशील शेतकऱ्यांकडून तसेच जाणकार लोकांकडून सल्ला घेऊन त्यांनी औषधांचे नियोजन केले. यामुळे यंदा त्यांना डाळिंब बागेतून चांगले उत्पादन मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे उत्पादित झालेला माल हा दर्जेदार असल्याने बाजारात चांगला दरही मिळाला आहे.