Farmer Success Story :- कुठल्याही पिकाचे उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन तसेच योग्य त्या कालावधीमध्ये जर लागवड केली तर नक्कीच त्या पिकापासून फायदा होतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर बाजारपेठेचा अभ्यास करून जर पिकांच्या लागवडीचे नियोजन केले तर भरघोस उत्पादन मिळतेच परंतु बाजारपेठेत देखील चांगला बाजार भाव मिळण्यास मदत होते.
या गोष्टीचा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल. तसेच मेहनत करण्याची तयारी आणि जबर इच्छाशक्ती असेल तर आपण कुठल्याही प्रकारच्या विपरीत आर्थिक परिस्थितीत शेतीत चांगले उत्पादन घेऊ शकतो हे देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून आपल्याला सिद्ध होते.
याच मुद्द्याला धरून जर आपण जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या एकेफळ या गावच्या शिवाजी बोचरे या अल्पभूधारक शेतकऱ्याचे जर नियोजन पाहिले तर एकाच एकरमध्ये आले पिकातून त्यांनी लाखोत कमाई केली आहे. या लेखात आपण शिवाजी बोचरे यांचे आले पिकाची नियोजन व त्यांची यशोगाथा बघणार आहोत.
एक एकर आल्यातून मिळवले तब्बल 12 लाखाचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एकेफळ या गावचे शिवाजी बोचरे यांनी यावर्षीच्या कमी पावसात देखील आले पिकाचे उत्तम नियोजन केले.
यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे विहिरींनी देखील तळ गाठला आहे व सध्या दुष्काळाचे वातावरण सगळीकडे दिसत आहे.
परंतु तरीदेखील शिवाजी बोचरे यांनी उत्तम पद्धतीने व्यवस्थापन करून एका एकरात आले पिकाची लागवड केली व उत्तम नियोजनाच्या जोरावर कमीत कमी खर्चात योग्य नियोजन करून एका एकरामध्ये बारा लाखांचे उत्पन्न मिळवले आहे
त्यांनी एका एकरमध्ये नियोजन केले व आल्याची लागवड केली. या आले पिकासाठी त्यांनी पाणी व्यवस्थापनापासून तर खत व्यवस्थापन तसेच मशागत इत्यादी गोष्टी खूप नियोजनबद्ध पद्धतीने केल्या व या सगळ्या बाबींसाठी तब्बल दोन लाखाचा खर्च एका एकरसाठी त्यांना आला.
सध्या त्यांची मेहनतीला फळ मिळाले असून आल्याचे काढणी आता सुरू झालेली आहे व बाजारपेठेमध्ये ते विक्रीसाठी देखील दाखल होत आहे. शिवाजी बोचरे यांना त्यांच्या नशिबाने देखील मोठी साथ दिली असून आल्याला आठ हजार रुपये प्रतिक्विंटल चा दर मिळत आहे.
एका एकर मधून त्यांनी 156 क्विंटल आल्याचे उत्पादन घेतले असून एकूण बारा लाख रुपये त्यांना आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. त्याच्यात एका एकर साठी त्यांनी दोन लाख रुपये खर्च केला असून तो खर्च 12 लाखांमधून वजा केल्यावर दहा लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे.
शेती परवडत नाही अशी ओरड किंवा तक्रार शेतकऱ्यांची असताना शिवाजी बोचरे यांनी मात्र नियोजन करत व कष्टाची जोड देत दुष्काळी परिस्थिती देखील खूप चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे.