Farmer Success Story : भारतीय शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी शेतकरी बांधव आता शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. मात्र जर शेतीमध्ये योग्य नियोजन आखलं, वेगवेगळे असे नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले आणि कष्ट करण्याची जिद्द ठेवली तर निश्चितच शेतीतून लाखोंची कमाई सहजरीत्या केली जाऊ शकते.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे कन्हेर येथील दोन शेतकरी बंधूंनी देखील असाच काहीच प्रयोग आपल्या शेतात केला आहे. या दोघा भावांनी आपल्या शेतात जमिनीत पपई लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला असून दोन एकरात 22 लाखांची कमाई त्यांना होणार आहे.
म्हणून सध्या या दोन बंधूंची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. बाळासाहेब सरगर आणि रामदास सरगर अशी यां दोन्ही बंधूंची नावे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की बाळासाहेब यांनी फुलवलेल्या दोन एकर पपई पिकातून त्यांना आत्तापर्यंत 25 रुपये प्रति किलो अशा दराने दोन ते तीन लाखांची कमाई झाली आहे. दरम्यान संपूर्ण पपई निघेपर्यंत असाच दर राहिला तर त्यांना जवळपास 22 लाखांची कमाई होणार आहे.
खरं पाहता कन्हेर गावात पाण्याची टंचाई फार पूर्वीपासून जाणवते. त्यातच बाळासाहेब यांच्या वाटेला दुष्काळी माळरानाची जमीन आली. मात्र तरीदेखील त्यांनी शेती करणे सोडले नाही. याऊलट दुष्काळी माळरान आले म्हणून त्यांना नवनवीन प्रयोग सुचले. याच प्रयोगाच्या अनुषंगाने पपईची शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी सर्वप्रथम पाण्याची उपलब्धता करण्यात आली. मग त्यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्या पावणेदोन एकर जमिनीत पपईची लागवड केली.
पावणे दोन एकर शेत जमिनीत 2100 रोपे लागवड करण्यात आली. दरम्यान आता या पपई बागेतून त्यांना उत्पादन मिळू लागले आहे. बाळासाहेबांनी उत्पादित केलेल्या एका पपई झाडाला 80 ते 100 फळे लागले आहेत. दुष्काळीपट्ट्यात माळरानावर पाण्याचा अभाव असलेल्या भागात बहरलेली ही पपई निश्चितच इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आतापर्यंत पावणेदोन एकर क्षेत्रात पपई पीक जोपासण्यासाठी त्यांना अडीच लाखांपर्यंतचा खर्च आला आहे.
यातून त्यांना 22 लाखांपर्यंतची कमाई होण्याची आशा असल्याने निश्चितच खर्चाच्या तुलनेत कमाईचा आकडा हा वाखान्यजोगा आहे. सद्यस्थितीला त्यांची पपई चेन्नई, कोलकाता सारख्या मोठ्या बाजारात विक्री होत असून तेथे पंचवीस रुपये प्रति किलोचा दर त्यांना मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी सेंद्रिय पद्धतीने पपई उत्पादित केली असून पाण्याचा अभाव असल्याने ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी उपयोग करत लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. निश्चितच सरगर बंधूंचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक असा राहणार आहे.