Farmer Success Story:- शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आता बदलाचे वारे वाहायला लागले असून तंत्रज्ञानाची मदत आणि शेतीची बदललेली पद्धत या दोन गोष्टींमुळे शेतकरी अगदी कमी क्षेत्रामध्ये देखील लाखोंचे उत्पन्न घ्यायला लागले आहेत. त्यामध्ये ज्याप्रमाणे तरुण वर्ग पुढे आहे अगदी त्याचप्रमाणे अनेक महिला देखील आता मागे नाहीत.
अनेक महिलांनी आता शेती क्षेत्रामध्ये अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. पुरुषांना देखील लाजवेल अशा पद्धतीची शेती महिला करत आहे. अगदी याच पद्धतीने दिशा फाउंडेशन चे अध्यक्ष व प्रगतीशील महिला शेतकरी सरिता सुनील फुंडे यांची यशोगाथा पाहिली तर ती देखील एक प्रेरणादायी अशीच आहे.
त्यांनी शेतीमध्ये पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला शेतीची कास धरली व चार एकर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकाचे उत्पादन घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यामध्ये यश मिळवले आहे.
सरिता फुंडे भाजीपाला शेतीतून कमवतात लाखो रुपयांचे उत्पन्न
सरिता सुनील फुंडे हे दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष असून एक प्रगतिशील महिला शेतकरी म्हणून देखील त्यांची चांगली ओळख आहे. जेव्हा त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी ओळखले की धान पिकाने शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकत नाही. याकरिता शेतीमध्ये भाजीपाला व फळबागा पिकांची नितांत आवश्यकता आहे.
त्यामुळे त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये भाजीपाला शेतीचा प्रयोग करण्याचे ठरवले व इतर शेतकऱ्यांना प्रेरणा द्यायचे महत्त्वपूर्ण काम या माध्यमातून त्यांनी केले. त्यांची जर आपण भाजीपाला शेती बघितली तर यामध्ये त्यांनी वैविध्य जपले आहे व त्यांनी चार एकर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या भाजीपाला पिकाची लागवड केलेली आहे.
सध्या त्यांनी एक एकर क्षेत्रात कारले, दीड एकर जागेमध्ये वांगे व अर्धा एकर क्षेत्रामध्ये चवळी व एक एकरमध्ये कोहळ्याची लागवड केलेली आहे. सध्या त्यांना दीड एकर जागेत लावलेल्या वांग्यापासून उत्पन्न मिळाल्या सुरुवात झाली आहे व वांग्याला सध्या 50 ते 60 रुपये प्रति किलो दर मिळत आहे.
700 किलो पर्यंत वांग्याचे उत्पादन
विशेष म्हणजे त्यांनी घेतलेले हे वांगे भरघोस पद्धतीने उत्पादन देत असून चार दिवसानंतर तोडा करावा लागत आहे. एका तोड्यातून साधारणपणे 700 किलो पर्यंत वांग्याचे उत्पादन त्यांना मिळत आहे. तसेच अर्धा एकरमध्ये चवळी लावली असून या चवळी उत्पादनाला देखील सुरुवात आता झाली आहे व चवळीला देखील बाजारपेठेत 40 ते 50 रुपयांचा दर सध्या मिळत आहे.
अशाप्रकारे एका हप्त्याला 69 ते 75 हजार रुपये पर्यंतचे उत्पन्न ते घेत आहेत. तसेच कारले पिकाला सध्या जो काही दर मिळत आहे तो जर पुढील दोन महीने असाच टिकला तर एका एकरातील कारले चार लाखांचे उत्पन्न त्यांना देईल अशी अपेक्षा आहे.
या सगळ्या भाजीपाला पिकाचे नियोजन करताना त्यांनी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर जास्त करण्यावर भर दिला आहे व या माध्यमातून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा हे सूत्र त्यांनी शक्य करून दाखवले आहे.
वांग्यापासून आहेत त्यांना अपेक्षा
चार एकर क्षेत्रापैकी त्यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये वांग्याची लागवड केली असून सध्या वांग्याचे भरघोस उत्पादन त्यांना मिळत आहे व बाजारामध्ये देखील चाळीस रुपयापासून ते साठ रुपये पर्यंतचा बाजार भाव वांग्याला मिळत आहे. वांगे आणि अर्धा एकर मधील चवळी यातून पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.
या भाजीपाला पिकां व्यतिरिक्त थोड्या प्रमाणामध्ये त्यांनी शेतात लिंबू तसेच ॲपल बोर व आंब्यांची देखील लागवड केली आहे. विशेष म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये वांग्यामध्ये फणस हे आंतरपीक लागवड करण्याची त्यांचे नियोजन असून या माध्यमातून फळबागांमध्ये देखील काम करण्याचे त्यांचे नियोजन आहे. विशेष म्हणजे त्यांनी या भाजीपाला शेतीच्या माध्यमातून आठ ते दहा मजुरांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.