स्पेशल

Farmer Success Story: साताऱ्यातील ‘हा’ तरुण शेतकरी कोरफड लागवडीतून करतो वर्षाला 3 कोटीपेक्षा अधिकची उलाढाल! वाचा कसे आहे नियोजन?

Published by
Ahmednagarlive24 Office

Farmer Success Story:- तरुणाई कुठल्याही क्षेत्रामध्ये गेली तरी त्यांच्यातला उत्साह आणि काहीतरी नवीन करण्याची त्यांची इच्छा त्यांना कधीही स्वस्त बसू देत नाही व ते कायमच नवनवीन प्रयोग अगदी धाडसाने राबवतात व ते तडीस देखील नेतात.

अगदी हीच पद्धत आपल्याला तरुणाईची शेती क्षेत्रामध्ये देखील दिसून येते. सध्या नोकऱ्या खूप कमी असल्यामुळे किंवा नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्याने अनेक सुशिक्षित तरुण आता शेती क्षेत्राकडे पाऊल ठेवत आहेत व शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून ते यशस्वी करत आहेतच.

परंतु त्या माध्यमातून लाखो ते कोटीची उलाढाल देखील करत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण साताऱ्यातील एका युवा शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर ती इतर तरुण शेतकऱ्यांना किंवा तरुणांना प्रेरणा देणारी आहे.

या तरुणाने शेतामध्ये कोरफड लागवड केली व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोरफडीला चांगली बांधणी असल्यामुळे या तरुण शेतकऱ्याला खूप मोठा फायदा झाला. आज हा तरुण कोरफडीतून वर्षाला साडेतीन कोटींची उलाढाल करत आहे. या तरुण शेतकऱ्याचे नाव ऋषिकेश ढाणे असे आहे.

अशाप्रकारे केली कोरफड शेतीची सुरुवात :सातारा जिल्ह्यातील पाडळी येथे शेतकऱ्यांना एका व्यावसायिकाने कोरफड लागवडीची कल्पना दिलेली होती व या व्यावसायिकाच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांनी कोरफड लावलेली होती.

परंतु जशी कोरफड काढणीला आली तसा मात्र या व्यवसायिकाने शेतकऱ्यांना कुठलाही प्रतिसाद न देता तो गायब झाला. त्यामुळे पाडळी गावातील ज्या शेतकऱ्यांनी कोरफड लागवड केलेली होती त्यांना ती कोरफड कुठे विकावी हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. कोरफडीची विक्री करता न आल्याने अनेक शेतकऱ्यांनी ती अक्षरशः टाकून दिली.

परंतु ऋषिकेशने मात्र हीच संधी हेरली व शेतकऱ्यांनी टाकून दिलेली कोरफडीचे रोपे त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये लावली व त्यातूनच तो आज कोट्यावधीची कमाई करत आहे. ऋषिकेश ची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने जेव्हा त्याचे वय वीस वर्षे होते तेव्हा तो एका मार्केटिंग कंपनीमध्ये नोकरी करत होता. परंतु कालांतराने ती नोकरी त्याच्या हातातून गेली व त्यांनी नंतर गावांमध्ये एक नर्सरी सुरू केली.

जेव्हा 2007 मध्ये पाडळी गावातील शेतकऱ्यांनी कोरफड टाकून दिली तेव्हा ऋषिकेशने त्यातील 4000 कोरफडीचे रोपे त्याच्या शेतात लावली. पुढे यावर प्रयोग करत त्याने कोरफडीच्या माध्यमातून शाम्पू तसेच ज्यूस व साबणासारखी अनेक उत्पादने तयार करायला सुरुवात केली. 2013 पर्यंत त्याने या कोरफडीच्या उत्पादनाचे व्यवसायामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.

कोरफड ही त्वचाच नाही तर शरीराच्या अनेक आजारावर रामबाण समजली जाणारी वनस्पती असल्याने भारतातच नव्हे तर विदेशात देखील तिचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. ही संधी ओळखून कोरफड लावण्याचा निर्णय ऋषिकेशने घेतला.

इतर शेतकऱ्यांनी टाकून दिल्यामुळे कुतूहलाने ऋषिकेशने कोरफड लागवड केली व हाच निर्णय त्याचे नशीब बदलवून गेला व आज हा तरुण कोरफडी पासून उत्पादने बनवून त्यापासून कोट्यावधी रुपये कमवत आहे.

Ahmednagarlive24 Office