स्पेशल

Farmer Success Story: ‘या’ तरुणाने इंजिनिअरिंगचा नाद सोडला आणि 2 हेक्टर मध्ये सुरू केली मत्स्यशेती! वर्षाला आहे 20 लाख रुपयांचा टर्नओव्हर

Published by
Ajay Patil

Farmer Success Story:- उच्च शिक्षण करून नोकरी मिळवणे कित्येक तरुणांचे स्वप्न असते. परंतु नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे प्रत्येकाला नोकरी मिळेल याची शाश्वती आताच्या परिस्थितीत राहिलेली नाही. त्यामुळे आता अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या मागे न लागता काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करताना आपल्याला दिसून येतात.

परंतु या उलट परिस्थिती देखील आपल्याला दिसून येते व ती म्हणजे काही उच्चशिक्षित तरुणांना चांगल्या पगाराची नोकरी देखील असते. परंतु त्यांना एखादा व्यवसाय करायचा असतो व त्यामुळे त्यांच्या अशा नोकरीच्या ठिकाणी मन लागत नाही व एखाद्या व्यवसायाच्या शोधामध्ये असतात व कालांतराने एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी उच्च पगाराची नोकरी सोडतात व व्यवसायामध्ये यशस्वी होतात.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण  बिहार राज्यातील किशनगंज जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुजफ्फर कमल साबा या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर ती नक्कीच इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी अशी आहे. हा तरुण इंजिनियर असून देखील त्याने इंजिनीयरची नोकरी सोडली आणि शेतीमध्ये आवड असल्याने शेती करायचे ठरवली व कृषी विज्ञान केंद्राची तांत्रिक मदत घेऊन मत्स्यपालन व्यवसायात उतरला. आज तो या मत्स्यपालन व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला असून याची या व्यवसायातील उलाढाल तब्बल 20 लाख रुपयांची आहे.

 मुजफ्फर कमल साबा यांचा अशा प्रकारे झाला मत्स्य शेतीकडे प्रवास

मुजफ्फर साबा याने 2011 मध्ये मौलाना आझाद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर बंगलोर मध्ये नोकरी करायला सुरुवात केली. नोकरी करत असताना मात्र डोक्यामध्ये काहीतरी व्यवसायाचे विचार सुरू होते व शेती करावी असे मनामध्ये सुरू असल्याने 2019 मध्ये त्यांनी नोकरी सोडली व गावी परतण्याचा निर्णय घेतला.

गावी परत आल्यानंतर शेती करावी हा मनात विचार असताना मात्र पारंपारिक पद्धतीने जी शेती आहे ती न करता या शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल असं वेगळे काहीतरी करावे अशी मनात इच्छा होती.

त्यामुळे शेतीला सोबत कुठला जोडधंदा करावा या विचारात असताना मत्स्य शेतीचा पर्याय त्यांनी निवडण्याचे ठरवले. परंतु मत्स्यशेती सुरू करावी हे ठरवले परंतु याबद्दलची कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती किंवा या क्षेत्रातला अनुभव नव्हता व त्याकरिता गुगलवर शोधाशोध सुरू केली आणि गुगलच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राची माहिती मिळाली.

त्यानंतर ताबडतोब किशनगंज येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन या क्षेत्रातील तज्ञांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले व आयुष्याला नवी दिशा देणारा निर्णय  प्रत्यक्षात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मत्स्यपालनाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मुजफ्फर कमल साबा यांनी घेतले व मत्स्यपालन व्यवसायाला सुरुवात केली.

 सुरुवातीला आल्या अनेक अडचणी

मत्स्यपालन व्यवसाय सुरू केल्यानंतर मात्र मुजफ्फर कमल साबा यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. परंतु प्रत्येक आव्हाने त्यांनी लिलया पेलली आणि व्यवसायामध्ये प्रगती सुरू केली. किशनगंज कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तलावाचे बांधकाम केले व मासे पालनासाठी योग्य प्रजातींची निवड केली.

त्यामध्ये प्रामुख्याने इंडियन मेजर कार्प आणि कॅट फिश या प्रजातींचे पालन अगोदर सुरू केले. आजमीतिला कमल साबा दोन हेक्टर क्षेत्रामध्ये दहा तलावांच्या माध्यमातून मत्स्यपालन व्यवसाय करत आहेत.

यामध्ये बायोफ्लॉक कल्चरचा वापर ते करतात व त्या माध्यमातून त्यांना दुप्पट उत्पन्न मिळत आहे. आज ते 150 क्विंटल मत्स्य उत्पादन घेतात आणि वार्षिक उलाढाल त्यांची वीस लाखांपेक्षा अधिक आहे.मत्स्यशेतीतील या कामामुळे कमल साबा यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले असून बिहार कृषी विद्यापीठाकडून उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

Ajay Patil