Success Story :- सध्या बेरोजगारीची समस्या संपूर्ण भारतामध्ये उग्र स्वरूप धारण करून उभी असून बेरोजगारीच्या समस्येवर मात करणे खूप कठीण होऊन गेलेले आहे. कारण दरवर्षी विद्यापीठांमधून पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांची संख्या आणि त्या मानाने उपलब्ध नोकऱ्याचे प्रमाण पाहिले तर ते खूपच व्यस्त असून
त्यामुळे हाताला काम धंदा नसलेले तरुण नोकरीच्या शोधार्थ वणवण भटकताना दिसून येतात. त्यातल्या त्यात शेतकरी कुटुंबातील तरुणांची व्यथा पाहिली तर ती आणखीनच भयानक आहे. घरी राहून शेती करायचे म्हटले म्हणजे विपरीत नैसर्गिक परिस्थिती आणि पिकवलेला शेतीमालाला मिळणारा मातीमोल बाजारभाव यामुळे शेतकरी अगोदरच त्रस्त झालेले आहेत व अशा कुटुंबातील मुलांची तर जास्तच होरपड होताना आपल्याला दिसून येते.
परंतु जर आपण यामध्ये काही तरुणांचा विचार केला तर शेतीचा आधार घेत त्या संबंधित एखादा व्यवसाय पुण्यासारख्या शहरात उभारून चांगल्या पद्धतीने व्यवसायात जम बसवून उत्तम नफा मिळवण्याचे कसब साध्य केल्याचे आपल्याला दिसून येते.
अगदी याच पद्धतीने जर आपण पैठण तालुक्यातील अमित मरकड या तरुणाची यशोगाथा पाहिली तर कामासाठी पुण्यात आलेल्या अमितने चांगले काम न मिळाल्याने निराश न होता शेतामध्ये पिकवलेला हुरडा विक्री करण्याचे निश्चित केले व या कल्पनेतूनच साकारली ती मराठवाडा हुरडा कंपनी. याच कंपनीची आणि अमितची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
अमितने कसा सुरू केला हुरडा विक्रीचा व्यवसाय?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका खेडेगावात राहायला असलेला अमित मरकड कामाच्या शोधार्थ पुण्यामध्ये आला. मनासारखे काम न मिळाल्याने एखादा व्यवसाय करावा या उद्दिष्टातून विचार करत असताना त्याला हुरडा विक्रीची कल्पना सुचली.
त्यानंतर त्याने व्यवसायाला सुरुवात करताना अगोदर गावाकडूनच हुरडा बनवून आणायचा व पुण्यामध्ये ओळखीच्या लोकांना किंवा मित्र मित्रमंडळींना तो विक्री करायचा. हळूहळू हा व्यवसाय चांगला सुरू झाल्यावर त्यामध्ये जम बसू लागल्याचे अमितच्या निदर्शनास आले.
त्यानंतर त्याने या व्यवसायाच्या वाढीसाठी सोशल मीडियाचा वापर करायचे ठरवले व सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार जाहिरात करत हुरडा विक्री सुरू केली. त्यानंतर व्यवसाय वाढत गेल्यावर एकट्याला हा व्यवसाय सांभाळणे कठीण जाऊ लागल्याने त्याने गावाकडचे राहुल जाधव,
श्रीकृष्ण थेटे व ऋषिकेश नवले या मित्रांना सोबत घेऊन पुण्यामध्ये साजरे होणारे विविध ठिकाणचे प्रदर्शन तसेच फेस्टिवलमध्ये स्टॉल लावायला सुरुवात केली व त्या माध्यमातून हुरडा विक्री सुरू झाली. एवढेच नाही तर ऑनलाईन पद्धतीने दररोज मोठ्या प्रमाणावर हुरडा विक्री व्हायला लागली. या व्यवसायातून अमितला आर्थिक नफा मिळायला लागलाच परंतु शेतकऱ्यांना देखील त्याचा खूप मोठा फायदा झाला.
यातूनच झाला मराठवाडा हुरडा कंपनीचा जन्म
हुरडा विक्री व्यवसाय जोमात सुरू झाल्यामुळे या व्यवसायाला ओळख मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी मराठवाडा हुरडा कंपनी अशा प्रकारचे व्यवसायाचे नामकरण केले. या मराठवाडा हुरडा कंपनीच्या माध्यमातून हुरडाच नाही तर केशर व हापूस आंब्याची विक्री देखील अमित करत असून त्या माध्यमातून देखील चांगले पैसे त्यांना मिळतात.
अमितला हा व्यवसाय वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा खूप मोठा फायदा झाला. सोशल मीडियाचा वापर करून हुरडा आणि हापूस आंबा पुण्याच्या अनेक भागांमध्ये पोहोचवणे त्यांनी सुरू केले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते ऑर्डर घेतात आणि एका खासगी कंपनीचा आधार घेत ते ग्राहकांपर्यंत हुरडा पोहोचवतात.
विशेष म्हणजे मराठवाडा हुरडा कंपनीच्या माध्यमातून पोहोचलेला हुरडा जर खराब निघाला तर दहा वेळा बदलून देण्याची गॅरंटी देखील ग्राहकांना त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे ग्राहकांचा देखील प्रचंड विश्वास असून अवघ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज पन्नास किलो हुरड्याची विक्री ते करत आहेत.
कसे आहे हुरडा विक्रीचे आर्थिक गणित?
यामध्ये हुरड्याचे वैशिष्ट्ये पाहिले तर याच्या उत्पादनाचा एक निश्चित कालावधी असल्यामुळे तो नोव्हेंबर ते जानेवारी या दोन ते तीन महिन्याच्या कालावधी करिता विक्रीस उपलब्ध होतो. या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये विविध ठिकाणी होणारे प्रदर्शन आणि फेस्टिवलमध्ये अमित व त्याचे मित्र खूप कष्ट घेतात व विविध ठिकाणी स्टॉल लावून हुरड्याची विक्री करतात.
तसेच ऑनलाईन पद्धतीने देखील मोठ्या प्रमाणावर विक्री होते. या तीन महिन्याच्या कालावधीत ते सर्व खर्च वजा जाता निव्वळ नफा तीन लाख रुपये मिळतात. वर्षातील उरलेल्या महिन्यांमध्ये उन्हाळ्यात याच पद्धतीचा वापर करून हापूस आणि केशर आंबा ची विक्री करतात.
अशा पद्धतीने नोकरी न मिळाल्याने निराश न होता कल्पकतेच्या जोरावर अमित मरकड व त्याच्या मित्रांनी या व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धी मिळवली आहे.