भारत हा कृषीप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून शेती क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पायाभूत सुविधांची उभारणी खूप महत्त्वाची आहे व या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक पावले उचलण्यात येत आहे.
या पावलांचाच भाग म्हणून सरकारच्या माध्यमातून शेती क्षेत्राशी संबंधित अनेक योजना राबविण्यात येतात व या योजनांच्या माध्यमातून शेती क्षेत्राचा व त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास व त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या साठी या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण असते.
शेती क्षेत्रासाठी सरकारने अनेक प्रकारच्या योजना राबवायला सुरुवात केली असून या योजनांमधील कृषी पायाभूत निधी योजना देखील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे.
शेतीमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ही योजना आर्थिक मदत करते व या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा तसेच रस्ते, गोदामे इत्यादींची उभारणी करता येते व या कामासाठी गुंतवणूक करणे शक्य होते. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसंबंधीचे तांत्रिक ज्ञान तसेच आर्थिक मदत व अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
काय आहे कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचे महत्त्व?
केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी योजना राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोसेसिंग युनिट, कोल्ड स्टोरेज तसेच गोदाम, पॅकेजिंग युनिट उभारण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार असून या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज देते.
या कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त सात वर्षांकरिता असतो व या कर्जावर तीन टक्के एवढा व्याजदर आकारला जातो. शेतकऱ्यांसाठी ही एक खूप फायद्याची योजना असून यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासास हातभार लागेल. या अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांसाठी आर्थिक मदत केली जाते.
त्यांना जर शेतीमध्ये सिंचनाच्या सुविधा किंवा गोदामे उभारायचे असतील तरी त्यांना या माध्यमातून कर्ज मिळते. या योजनेच्या माध्यमातून तांत्रिक व आर्थिक सहाय्य केले जाते व इतर सेवा देखील पुरवल्या जातात.
या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी वाढण्यास देखील मदत होईल व शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या स्वरूपाचे व्यवसाय करायचे असतील तरी या कृषी पायाभूत सुविधा निधी योजना अंतर्गत असे व्यवसाय सुरू करता येतात व त्यातून रोजगार निर्माण करता येतो.
शेतकऱ्यांना कसा घेता येईल या योजनेचा लाभ?
शेतकऱ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता www.agriinfra.dac.gov.in या वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येतो व अर्ज करताना सर्व माहिती भरणे गरजेचे आहे.
अर्ज केल्यानंतर दोन दिवसांनी केलेल्या अर्जाची पडताळणी केली जाते व हे सर्व काम झाल्यानंतर बँकेकडून या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची संपूर्ण प्रक्रिया 60 दिवसात पूर्ण केली जाते. त्यामुळे अधिकची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.