Harbara lagwad:- रब्बी हंगामाचे आता सुरुवात झालेली असून महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मका, कांदा, गहू तसेच कडधान्य वर्गीय पिकांमध्ये हरभऱ्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यामध्ये जर आपण हरभरा पिकाचा विचार केला तर बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असल्यामुळे हरभऱ्याला बाजार भाव देखील चांगला मिळतांना आपल्याला दिसून येतो.
त्यामुळे हरभऱ्याची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरू शकते. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 29 लाख हेक्टर क्षेत्र हे हरभरा पिकाखाली असून विदर्भामध्ये नऊ लाखापेक्षा जास्त क्षेत्रावर हरभरा लागवड केली जाते. परंतु क्षेत्राच्या मानाने जर आपण हरभरा पिकाची उत्पादकता बघितली तर ती कमी असल्याचे आपल्याला दिसून येते.
यामागे बरीच कारणे असून कधीकधी शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या चुका देखील उत्पादकता कमी होण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे हरभरा पिकाचे उत्तम व्यवस्थापन करून लागवडीसाठी जर सुधारित वाणांचा वापर केला तर नक्कीच उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
हरभरा पिकामध्ये काबुली हरभऱ्याचे देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या अनुषंगाने काबुली हरभऱ्याचे जर भरघोस उत्पादन हवे असेल तर काही छोट्या गोष्टी पाळणे किंवा काळजी घेणे खूप गरजेचे असते.
या गोष्टी पाळा आणि काबुली हरभऱ्याचे भरघोस उत्पादन मिळवा
1- काबुली हरभऱ्याच्या लागवडीकरिता पीकेव्ही काबुली दोन आणि पिकेव्ही चार या टपोऱ्या दाणे असलेल्या वाणांचा वापर करावा. कारण बाजारपेठेमध्ये टपोऱ्या दाण्याला जास्त दर मिळतो. त्यामुळे हरभरा लागवड करताना किंवा वानांची निवड करताना जास्तीत जास्त टपोरदाणे असतील अशा वाणाची निवड करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करावा.
2- ओलिताच्या क्षेत्रात पेरणी करताना ती 10 नोव्हेंबर पूर्वीच करून घ्यावी व त्यासाठी सरीवरंबा पद्धतीचा वापर करावा.
3- बियाण्याचे प्रमाण हे दाण्याच्या आकाराप्रमाणे वाढवावे किंवा कमी करावे. पेरणी करताना चाड्याचे छिद्र तपासून घ्यावे.
4- काबुली हरभऱ्याचे पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला बुरशीनाशक विटाव्हॅक्स पावर तीन ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा चार ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. तसेच रायझोबियम( एकेसीआर-1) व पीएसबी हे जैविक खते प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.
5- पेरणी करताना योग्य ओलावा जमिनीमध्ये असेल तेव्हाच करावी. ओलावा जर कमी असेल तर प्रथम जमीन ओलीत करून घ्यावी व वाफसा आल्यावर पेरावे.
पेरणी झाल्यानंतर जोपर्यंत अंकुर फुटत नाही तोपर्यंत ओलीत करू नये. तसेच पेरणी वरंब्याच्या दोन्ही बाजूला अर्ध्या उंचीवर करून ओलीत करताना सध्या पेरणीच्या खालच्या पातळीत भराव्या.
5- साधारणपणे लागवडीनंतर काबुली हरभऱ्याच्या पिकाला 45 दिवस तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळेला निंदणी व कोळपणी करून घेणे गरजेचे असते. तुम्ही जर एखादे शिफारशी तणनाशक फवारत असाल तर जमिनीमध्ये ओलावा असण्याची खात्री करून घ्यावी.
6- काबुली हरभऱ्याच्या पिकाला खत व्यवस्थापन करताना पंचवीस किलो नत्र व 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रती हेक्टर पेरणीच्या वेळेस द्यावे.
( या मात्रेकरिता प्रती हेक्टर 125 किलो डीएपी अथवा 50 किलो युरिया, तीनशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट) द्यावे तसेच जमिनीमध्ये जस्त कमी असेल तर ती कमतरता भरून काढण्यासाठी 20 किलो प्रती हेक्टर जिंक सल्फेट पेरणी करताना द्यावे.
7- जेव्हा हरभरा पीक फुलोरा अवस्थेत व घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये येईल तेव्हा पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. पाणी जर स्प्रिंकलर द्वारे दिले तर चांगले ठरू शकते. परंतु ओलीताद्वारे गरजेनुसारच पाणी व्यवस्थापन होईल त्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
8- पीक परिपक्वतेच्या कालावधीत घाटे आणि पाने जर पिवळे पडत असतील तर मात्र ओलीत करू नये व कापणी करताना घाटे जास्त सुकण्या अगोदरच कापणी करून घ्यावी.