स्पेशल

Share Market Scam : शेअर मार्केटच्या आमिषाने ८५ लाखांची फसवणूक; पीडिताची अधीक्षकांकडे धाव

Published by
Ahmednagarlive24 Office

Share Market Scam : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून जादा पैसा मिळत असल्याचे आमिष दाखवून शहरातील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याबाबत मुश्ताक बनेमियाँ शेख यांनी आपली ८५ लाखांची फसवणूक झाली असून, याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार केली आहे.

निवेदनात शेख यांनी म्हटले आहे की, सॉ मिलचा व्यवसाय चालत नसल्याने जागेसह त्याची विक्री केली. त्यातून पैसे आल्याचे समजताच, एका ओळखीच्या व्यक्तीने फेब्रुवारी २०२३ मध्ये हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्यास दरमहा १० ते १५ लाखांचा नफा मिळेल, तुमचे बँकेचे व्याज परस्पर या पैशांतून जाईल, असे सांगितले.

त्याला बळी पडून २० फेब्रुवारी २०२३ रोजी १५ लाख रुपये रोख दिले. त्याने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर स्वतःच्या कॉम्प्युटरवर स्वतःच करारनामा करून दिला. तसेच, ५-५ लाखांचे ३ धनादेश व केवळ तीन दिवसात त्याने १ लाख रुपये रोख दिले.

त्यातून विश्वास निर्माण केला. नंतर त्याने संपूर्ण रक्कम गुंतवण्याचा सल्ला दिला. त्यावर विश्वास ठेवून २७ फेब्रुवारी २०२३ रोजी साक्षीदारांसमक्ष २० लाख रुपये रोख दिले. त्याने ५ लाख रुपयांचे निरनिराळ्या तारखेचे ४ धनादेश व २० एप्रिल २०२३ पर्यंत ५ लाख रुपये रोख दिले. त्यानंतर आपण २४ एप्रिल २०२३ रोजी ५० लाख रुपये आरटीजीएसमार्फत त्याच्या खात्यावर पाठवले. मात्र, नंतर त्याने एक रुपयाही परतावा दिला नाही.

संबंधिताच्या घरी, ऑफीसवर जावून पैसे मागितले असता, सध्या ट्रेडींग बंद असल्याने पैसे देऊ शकत नाही, तुम्ही चिंता करू नका, असे सांगितले. जूनमध्ये परत पैसे मागणी केल्यावरही त्याने वेळ मारून नेली.

त्यानंतर पुन्हा पैशांसाठी गेलो असता, शिवीगाळ व धक्काबुक्की करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे शेख यांनी निवेदनात म्हटले आहे. याशिवाय शहरातील अनेकांना अशाप्रकारे गंडा घालण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक ओला यांनी श्रीरामपूर पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याचे समजते.

Ahmednagarlive24 Office