Fixed Deposit Interest Rate:- एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट हा जो गुंतवणुकीचा प्रकार आहे याला गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते.कारण एफडी ही प्रामुख्याने विविध बँका आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये केली जाते व या ठिकाणी केलेली गुंतवणुक ही सुरक्षित आणि जोखीममुक्त असते.
परंतु आता बँका व्यतिरिक्त अनेक ऑनलाईन पेमेंट कंपन्या देखील या स्पर्धेमध्ये उतरल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कारण अनेक विश्वासार्ह अशा ऑनलाइन पेमेंट कंपन्या बँकांपेक्षा जास्त व्याजदर देत असल्यामुळे बँकांना आता पूर्वीपेक्षा जास्त स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे.
अशाच पद्धतीने महत्त्वाची व प्रसिद्ध असलेली ऑनलाइन पेमेंट कंपनी मोबीक्विकने आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मुदत ठेव योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे यासाठी महिंद्रा फायनान्स, श्रीराम फायनान्स आणि बजाज फिनसर्व या वित्तीय सेवा कंपन्यांच्या भागीदारीत ही एफडी लाँच करण्याची घोषणा बुधवारी या ऑनलाइन पेमेंट कंपनीने केली.
मोबीक्विक वापरकर्त्यांना एफडीवर देणार 9.5 टक्के व्याज
मोबिक्विकने आपल्या वापरकर्त्यांना एफडीवर 9.5% व्याज देण्याची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे मोबीक्विक मध्ये एफडी सुरू करण्यासाठी तुम्हाला नवीन बँक खाते उघडण्याची देखील गरज नाही.
या ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मवर फक्त एक हजार रुपयांमध्ये एफडी सुरू करता येणार आहे. तसेच वापरकर्त्यांना कमीत कमी सात दिवस ते कमाल साठ महिने पाच वर्षाच्या कालावधीसाठी एफडी करण्याची सुविधा मिळणार आहे.
मोठ्या बँकांच्या तुलनेत ग्राहकांना मिळेल दोन टक्के अतिरिक्त व्याजाचा फायदा
जर आपण भारतातील प्रसिद्ध बँक जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक तसेच एचडीएफसी व आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक इत्यादी बँकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर या बँका ग्राहकांना एफडीवर 9.5% व्याज देत नाहीत. स्टेट बँक ऑफ इंडिया 444 दिवसांच्या एफडीवर 7.25%,
पंजाब नॅशनल बँक चारशे दिवसांच्या एफडीवर 7.30%, एचडीएफसी बँक चार वर्ष सात महिने ते 55 महिन्यांच्या एफडीवर 7.40%, आयसीआयसीआय बँक जास्तीत जास्त एफडीवर 7.25 टक्के व्याज ऑफर देते. परंतु या तुलनेत मात्र मोबीक्विक ग्राहकांना एफडीवर 9.5 टक्के व्याज देत असल्यामुळे वापरकर्त्याना नक्कीच केलेल्या एफडीवर या माध्यमातून जास्त परतावा मिळू शकतो.