स्पेशल

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज…! दक्षिण मध्य रेल्वे सुरू करणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं असणार वेळापत्रक ? वाचा….

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Rail : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात फेस्टिवल सिझन सुरू आहे. सर्वसामान्य जनतेत मोठे आनंदाचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांनी गणेशोत्सवाचा सण साजरा होणार आहे, त्यानंतर नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळीचा मोठा सण येणार आहे.

या सणानिमित्त प्रवाशांची मोठी गर्दी होणार आहे. दरम्यान हीच संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे महाराष्ट्रामार्गे एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य रेल्वे दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिकंदराबाद ते नगरसोल दरम्यान दिवाळी विशेष गाडी चालवणार आहे.

या विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या होणार असून ही गाडी मराठवाड्यातून चालवली जाणार असल्याने याचा मराठवाड्यातील नागरिकांना देखील मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, आता आपण या दिवाळी विशेष गाडीचे वेळापत्रक नेमके कसे राहणार ही गाडी कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असेल वेळापत्रक ? 
दक्षिण मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सिकंदराबाद -नगरसोल दिवाळी विशेष गाडी ९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून दर बुधवारी सायंकाळी ५ वाजता सोडली जाईल अन नगरसोल रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी आठ वाजता पोहोचणार आहे.

तसेच नगरसोल ते सिकंदराबाद दिवाळी विशेष गाडी १० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी नगरसोल रेल्वे स्थानकावरून दर गुरुवारी रात्री १० वाजता सोडली जाणार आहे आणि सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी अर्थातच शुक्रवारी सकाळी १०:५० वाजता पोहोचणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?


या विशेष एक्सप्रेस ट्रेनला लिंगमपल्ली, शंकरपल्ली, विकाराबाद, जाहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू, जालना, छत्रपती संभाजीनगरसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office