Soybean News : सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची पेरणी केली जाते.
या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. सोयाबीन पीक उत्पादित करण्यासाठी येणारा खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नसल्याचे बोलले जात आहे.
यंदाही अशीच परिस्थिती असून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात अडचणी सापडले आहेत. खुल्या बाजारात सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने विक्री होत असल्याची वास्तविकता असल्याने सोयाबीनची विक्री ही शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावरचं करण्याला शेतकरी बांधव पसंती दाखवत आहेत.
मात्र खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी रखडत सुरू आहे. राज्यात सोयाबीन खरेदी सुरू झाली तेव्हापासून अडचणी कायम होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या अडीच महिन्यांमध्ये खरेदी रखडत सुरू होती. शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये बारदाना नसल्याने बहुतांशी केंद्रांवर खरेदी अक्षरशः ठप्प होती.
यातच १२ जानेवारीची पहिली खरेदीची मुदत संपली अन सरकारने नंतर ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. सुरुवातीचे दोन-तीन दिवस तरीही बारदाना मिळाला नव्हता, मात्र नंतर सरकारने बारदाना उपलब्ध करून दिला अन आता खेरदी वेगाने सुरू आहे.
खरेदी प्रक्रियेतील अडचणी दूर झाल्या असल्याने आता खरेदीची प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे, पण जेव्हा खरेदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला त्यावेळी सरकारने प्रत्येक जिल्ह्याला नवीन खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हानिहाय खरेदीचे उद्दिष्ट दिल्याने आता शेतकऱ्यांची अडचण होणार असे दिसत आहे.
कारण काही जिल्ह्यांमध्ये खरेदीला वेग आल्याने उद्दिष्ट पूर्ण झाले आहे अन यामुळे शेतकरी बांधव संभ्रम अवस्थेत आहेत. खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर काय होणार? खरेदीची प्रक्रिया थांबवली जाणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. दरम्यान विदर्भ विभागातील अकोला जिल्ह्यात खरेदीचे उद्दिष्ट तीन दिवसांपूर्वीच म्हणजे गुरुवारी पूर्ण झाले होते.
त्यामुळे तेथे खरेदी थांबवावी लागली होती. आजही जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर शेतकरी गाड्या घेऊन खरेदीची वाट पाहत आहेत. खरेतर, जिल्ह्यांचे खरेदीचे उद्दिष्ट संपले म्हणजे खरेदी बंदच होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच अकोला जिल्ह्यात उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी थांबवल्याचे दिसले होते.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था तयार झाली आणि नाराजी देखील पाहायला मिळाली. अशातच आता पणन मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पणन मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे उद्दिष्टे पूर्ण झाल्यानंतर देखील खरेदी प्रक्रिया सुरूच राहणार आहे.
ज्या जिल्ह्यांचे खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले त्या जिल्ह्यांना सुधारित वाढीव उद्दिष्ट देण्यात येईल अन खरेदी सुरूच राहील. म्हणजेच जिल्ह्याचे खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले तरी खरेदी थांबणार नाही उलट जिल्ह्यांना वाढीव उद्दिष्ट देण्यात येणार आहे. नक्कीच पणन मंत्रालयाच्या या स्पष्टीकरणानंतर सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.