Gratuity Formula : जर तुम्ही शासकीय किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. शासकीय किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीची रक्कम मिळत असते. मात्र या दोन्ही सेक्टर मध्ये नोकरी करणाऱ्यांना दिली जाणारी ग्रॅच्युइटी वेगवेगळ्या पद्धतीने मोजली जाते.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि जुनी पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त ग्रॅच्युइटी मिळते. नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळत नाही.
मात्र महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या आणि नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात सुधारित पेन्शन योजना लागू केली जाणार आहे. शिंदे सरकारने नुकताच सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शासन निर्णय निघालेला नाही मात्र लवकरच याचा जीआर निघणार आहे.
दरम्यान या सुधारित पेन्शन योजना अंतर्गत ग्रॅच्युइटीची रक्कम देण्याचे प्रावधान राहणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कमाल 14 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटीची रक्कम दिली जात असते. म्हणजेच यापेक्षा जास्तीची ग्रॅच्युइटीची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकत नाही.
दरम्यान, आज आपण प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करणाऱ्या नोकरदार मंडळीला किती ग्रॅच्युइटी रक्कम दिली जाते, ही रक्कम कशी ठरवली जाते, यासाठी कोणता फॉर्मुला वापरला जातो, यासाठी कोण पात्र राहतात? अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ग्रॅच्युइटी काय असते?
ग्रॅच्युइटी रक्कम कर्मचाऱ्याला संस्थेकडून किंवा मालकाकडून मिळते. पण यासाठी कर्मचाऱ्याने सदर कंपनीत किमान ५ वर्षे काम करणे बंधनकारक आहे. सहसा ही रक्कम जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी सोडतो किंवा तो निवृत्त होतो तेव्हा दिली जाते.
एखाद्या कर्मचाऱ्याचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे नोकरी सोडल्यास, त्याला किंवा त्याच्या नॉमिनीला ग्रॅच्युइटीची रक्कम मिळते.
ग्रॅच्युइटीसाठीची पात्रता
ग्रॅच्युइटी पेमेंट कायदा 1972 च्या नियमांनुसार, ग्रॅच्युइटीची कमाल रक्कम 25 लाख रुपयांपर्यंत असू शकते. ग्रॅच्युइटीसाठी कर्मचाऱ्याला एकाच कंपनीत किमान ५ वर्षे काम करणे बंधनकारक आहे.
यापेक्षा कमी कालावधीसाठी नोकरी असल्यास, कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र नाही. 4 वर्षे 11 महिन्यांत नोकरी सोडली तरी ग्रॅच्युइटी दिली जात नाही. मात्र, कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू किंवा अपघातामुळे नोकरी सोडल्यास हा नियम लागू होत नाही.
ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते
ग्रॅच्युइटी रक्कम मोजण्यासाठी (अंतिम वेतन) x (15/26) x (कंपनीत किती वर्षे काम केले आहे) हा फॉर्म्युला वापरला जातो. जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत सहा वर्षांसाठी काम केले आहे आणि त्याचे अंतिम वेतन तीस हजार रुपये आहे तर त्या कर्मचाऱ्याला (30000)×(15/26)×(6) = एक लाख तीन हजार 846 रुपये एवढी ग्रॅच्यूटी मिळणार आहे.