Havaman Andaj : आज लक्ष्मीपूजनाचा दिवस, आज माता लक्ष्मीची पूजा-अर्चना करत सर्वजण सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करणार आहेत. मात्र राज्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याकडून समोर आला आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे. गत दोन दिवसांमध्ये राज्यातील काही भाग वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले आहे.
कमाल आणि किमान तापमानात नक्कीच चढ-उतार होत आहे मात्र पावसाने उघडीप दिलेली आहे. हवामान खात्याने 29 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होणार असा अंदाज दिला होता मात्र महाराष्ट्रात पावसाला सुरुवात काही झाली नाही.
पण आज अर्थातच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील तब्बल नऊ जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
एकंदरीत यंदाच्या दिवाळीला वरून राजाची देखील साक्ष राहणार आहे. पण, पावसामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचं सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.
विशेषतः या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असे म्हटले जात आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे या पावसामुळे नुकसान होण्याची भीती आहे. तथापि हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी वरदान ठरू शकतो.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करावे असा सल्ला यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे. आता आपण आज महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
राज्यातील या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे, आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यातील तीन जिल्ह्यात शनिवार पर्यंत पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज आहे.
पण राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ हवामान आणि प्रामुख्याने कोरडे हवामान राहील असा अंदाज आहे. आय एम डी ने कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या अनुषंगाने दक्षिण कोकण, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील या सदरील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे.