स्पेशल

Animal Care: कसे ओळखाल जनावरांना विषारी साप चावला आहे की बिनविषारी? जनावरांमध्ये काय असतात सर्पदंशाची लक्षणे?

Published by
Ajay Patil

Animal Care:- सध्या पावसाळ्याचा कालावधी सुरू असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बऱ्याच भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवली असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे सध्या स्थिती आहे. कोल्हापूर सारख्या जिल्ह्याला तर सध्या महापुराचा फटका बसतो की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आपण बघत आहोत.

या सगळ्या पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या नागरिकांना सहन कराव्या लागतात व तशा त्या प्राणीमात्रांना देखील सहन कराव्या लागतात. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये जर आपण समस्या पाहिल्या तर यामध्ये सर्पदंशाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते.

माणसांनाच नाही तर अगदी जनावरांना देखील साप चावल्याच्या घटना घडतात व यामुळे कधीकधी जनावरांचा मृत्यू देखील होऊ शकतो. सापांच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारतामध्ये साधारणपणे 300 सापांच्या जाती आहेत व त्यातील पन्नास जाती या विषारी आहेत. या 50 मध्ये पण चार जाती जास्त विषारी समजल्या जातात.

जनावरांना जर सर्पदंश झाला तर तो प्रामुख्याने त्यांच्या तोंडावर, पुढचे किंवा मागचे पाय इत्यादीवर होतो. पावसाच्या कालावधीमध्ये आपण जनावरांना बाहेर चरायला सोडतो व अशावेळी या घटना घडतात. बऱ्याचदा जनावरांना सर्पदंश झाला आहे की नाही हे लवकर कळत देखील नाही.

परंतु जर काही लक्षणे बघितली तर आपल्याला ओळखता येऊ शकते की जनावराला साप चावला आहे. त्यातल्या त्यात नेमका साप विषारी चावला आहे की बिनविषारी हे देखील ओळखता येणे कठीण जाते. अशा समस्या विषयीची माहिती या लेखात आपण थोडक्यात बघणार आहोत.

 जनावरांना साप चावला तर ही लक्षणे दिसतात

1- जनावरांना ज्या ठिकाणी साप चावलेला असतो त्या ठिकाणी सुरुवातीला सूज खालच्या बाजूला येते व नंतर ती सूज वरच्या दिशेने चढायला लागते किंवा वरच्या दिशेने दिसायला सुरुवात होते. जनावर चालताना लंगडते व नाक व लघवीतून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते.

2- जनावरांना जर नाग या विषारी सापाने चावा घेतला असेल तर जनावर थरथरायला लागते व त्याच्या तोंडातून लाळ गळते. जनावर दात खाते व डोळ्यांच्या पापण्यांची  उघडझाप बंद होते.

लवकर उपचार मिळाले नाही तर जनावर जमिनीवर आडवे पडते व झटके द्यायला लागते. घोणस जातीचा साप जर चावला तर मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो व वेगाने सूज वाढते.

3- मन्यार जातीच्या सापाने जर चावा घेतला तर यामध्ये सूज कमी असते व लक्षणे देखील उशिराने समजतात. परंतु या जातीचा साप चावल्यामुळे जनावरांना अंतर्गत रक्तस्राव होतो व पोटात दुखायला लागते व जनावरांना झटके येतात व ते सारखी उठबस करतात. पशुपालकांनी अशा लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असते.

 कसे ओळखाल जनावरांना विषारी साप चावला आहे की बिनविषारी?

जसे आपण पाहिले की सापाच्या 300 प्रजाती आहेत व त्यापैकी 50 विषारी व त्यातील चार अति विषारी आहेत. जनावरांना नेमका यापैकी बिनविषारी साप चावला आहे की विषारी साप हे ओळखणे आपल्याला कठीण जाते. परंतु साप चावल्यानंतर शरीरावर जखम होते व त्यावरून आपण साप बिनविषारी होता की विषारी हे ओळखू शकतो.

जर जनावरांना विषारी सापाने चावा घेतलेला असेल तर दोन खोल जखमा आपल्याला दिसतात. अशा प्रकारच्या जखमा जर आपल्याला दिसले तर समजावे की जनावराला विषारी सापाने चावा घेतला आहे.

तसेच जर साप चावल्याच्या ठिकाणी इंग्रजी यु(U) आकारामध्ये खरचटल्याप्रमाणे जखम दिसत असेल तर समजावे की बिनविषारी साप चावला आहे. तसेच विषारी साप चावला असेल तर वेदना खूप मोठ्या प्रमाणावर होतात व जनावरे खाणे पिणे देखील बंद करतात. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो.

अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला पटकन उपाय करायचा असेल तर जनावरांना पूर्ण विश्रांती देऊन त्यांना हालचाल करू देऊ नये. तसेच ज्या ठिकाणी सापाने दंश केलेला असेल त्याच्या वरच्या बाजूला घट्टपट्टीने आवळून बांधावे व दर वीस मिनिटांनी अर्धा मिनिटांसाठी ती पट्टी सोडावी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला पशुवैद्यकीय तज्ञांकडे जाऊन उपचार करता येईल तेवढा जायचा प्रयत्न करावा व पटकन उपचार सुरू करावे.

Ajay Patil