Sujay Vikhe Patil News : महाराष्ट्रात विधानसभाच्या निवडणुकीत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या अनेक उमेदवारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये अनेक मोठ-मोठ्या नावाचा समावेश होता. सुजय विखे पाटील हे देखील असेच एक मोठे नाव. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. मात्र आता हा पराभव पचवून माजी खासदार विखे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहेत.
नुकतेच सुजय विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघात आयोजित आपला दादा आपल्या दारी या कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यावेळी सुजय विखे पाटील यांच्या मनातील अनेक गोष्टी ओठांवर आल्या आहेत. सुजय विखे पाटील यांनी या कार्यक्रमात शिर्डी मतदारसंघाच्या संपूर्ण बॉर्डरवर जर कोणीही जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरविण्याच काम केलं तर तुमची गाठ माझ्याशी आहे असं वक्तव्य केलं आहे. यामुळे या वक्तव्याची नगरच्या राजकारणात मोठी चर्चा होत आहे. या वक्तव्यातून डॉ सुजय विखेंचा रोख नेमका कुणाकडे आहे, हा यक्षप्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
काय म्हटलेत सुजय विखे पाटील?
या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पूर्ण बॉर्डरवर मी तुम्हाला आवर्जून सांगतो की, जर इथे कोणीही जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरवण्याचे काम केलं तर तुमची गाठ माझ्याशी आहे. इथ कोणीही असुरक्षित नाही. कोणालाही संरक्षणाची गरज नाही. इथं हिंदूंना गरज नाही आणि इथं मुसलमानांना देखील संरक्षणाची गरज नाही. वर्षानुवर्षे आपण एकत्र राहिलोय, मग आज अचानक का संरक्षण हवंय. कोणत्या जातीच्या माणसाचं काम जात विचारून केलं जातं. ज्यांना जातिवाद धर्मवाद करायचा असेल त्यांनी मला सांगा मग आम्हीही अर्ज करताना धर्म जात लिहायला सांगू.
तुमच्या मतदारसंघात 30 वर्षांपासून तुमच्या नेतृत्वाने तुमचं काम करत असताना जात विचारली नाही. पण ते जातीचे विष काही लोक पसरवण्याचे काम करतायेत. मात्र हे अजिबात व्हायला नको. आपण समृद्ध आहोत. आपण साईबाबांच्या भूमीत आहोत. ज्या साईबाबांनी कधीच धर्म आणि जातीमध्ये भेदभाव केला नाही त्या साईबाबांचे अनुयायी म्हणून आपण त्यांचा संदेश अन शिकवण संपूर्ण देशभरात पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. सर्वसामान्य माणसाला टीव्हीवर काय सुरू आहे याचा काही फरक पडत नाही.
सामान्य माणसांना फक्त त्यांचे काम झाले पाहिजे असे वाटते. यामुळे सर्वसामान्यांसाठी कामे केले पाहिजेत. पण दुर्दैवाने जाती-धर्माच्या राजकारणाला माझ्यासारखा सक्षम माणूस बळी ठरला. विकास मागे ठेवून माझा पराभव झाला. पण हे जर करायचं असेल तर कधीच विकास होणार नाही. मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे. बाकीचे लोक इन्कमिंग साठी राजकारण करतात मात्र आम्ही एकमेव परिवार आहोत जे आउटगोइंग साठी राजकारण करते. कोणीही काही मदत मागितली तर आपल्या एक रुपयाचा विचार न करता मदत केली जाते.
आपण साईबाबांच्या भूमीत जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. म्हणून साईबाबांचे संदेश आणि शिकवण आपण तंतोतंत पाळली पाहिजेत. अशीच भूमिका आपली असायला हवी. उर्वरित महाराष्ट्रात, देशात हे सगळं चालेल. पण हे आपल्या भागात व्हायला नको. ज्या दिवशी कुठल्याही समाजात, कुठल्याही जातीमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होईल त्या दिवशी पहिली घटना घडेल ती म्हणजे दंगल होईल. पण शिर्डी हे एकमेव मतदार संघ आहे जिथे सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात असतानाही आपण दंगल घडू दिली नाही. का घडू दिली नाही कारण की आपण कोणालाच असुरक्षित वाटू दिले नाही.
अन ती जबाबदारी फक्त सुजय विखे पाटील यांची किंवा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची नाही तर ती जबाबदारी इथं बसलेल्या सर्वांची आहे. म्हणून तुम्ही प्रश्न मांडा ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आमची आहे. पण समाजात जे चालू आहे ते योग्य नाही. समाजहिताचे नाही. ते कुणीही करू नये, निदान माझ्या पाठीमागे असणाऱ्यांनी तरी करू नये. बाकीच्यांनी करायचे त्यांनी करावे. मी या गोष्टीच समर्थन करत नाही आणि भविष्यातही करणार नाही. माझ्यासाठी सर्व लोक समान आहेत. ज्याचे त्याचे प्रश्न मांडले जात आहेत. सरकार ते सोडवत आहे. पण त्या गोष्टीसाठी आपण आपापसात भांडून ही भावना निर्माण करू नये, असे वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केले आहे.