Law For Property Transfer:- संपत्ती किंवा प्रॉपर्टीच्या वाटपा संदर्भात जर आपण बघितले तर अनेक प्रकारचे वाद उद्भवताना आपल्याला दिसतात. यामध्ये अनेक कायदेशीर गुंतागुंत बऱ्याचदा निर्माण होते व असे वाद कोर्टाच्या दारात देखील पोहोचतात. प्रॉपर्टी वाटपा संबंधीचे वाद हे भावा भावांमध्ये किंवा भावा बहिणींमध्ये देखील दिसून येतात.
परंतु प्रॉपर्टी वाटपा संबंधित जर बघितले तर भारतामध्ये महत्त्वपूर्ण असे कायदे आहेत व या कायद्याच्या चौकटीतच राहुन अशाप्रकारे प्रॉपर्टीचे हस्तांतरण किंवा प्रॉपर्टी वर मालकी हक्क हा मिळत असतो. यामध्ये बऱ्याचदा आपल्याला दिसून येते की एखाद्या वेळेस अचानकपणे जर आई-वडिलांचा मृत्यू झाला व त्यांनी त्या प्रॉपर्टी वाटपा संबंधित इच्छापत्र किंवा मृत्युपत्र तयार केले नसेल तर मुलांना नेमका त्या प्रॉपर्टीमध्ये काही हक्क असतो का? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
तसेच बऱ्याचदा आई-वडिलांचा घटस्फोट होतो व अशावेळी मुलांचा प्रॉपर्टीवर काय अधिकार असतो किंवा दत्तक घेतलेले मुलं असेल तर त्याला कशा प्रकारचा अधिकार प्रॉपर्टीमध्ये मिळत असतो? हे देखील आपल्याला माहीत असणे तितकेच गरजेचे आहे.याचीच माहिती आपण या लेखात बघू.
अल्पवयीन मुलांचे मालमत्तेवर कोणत्या प्रकारचा असतो अधिकार?
जर आपण हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 आणि हिंदू उत्तराधिकार( सुधारणा) कायदा 2005 नुसार जर बघितले तर मुलगा किंवा मुलगी यांना जन्मताच वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क आहे. परंतु जर त्यांच्या पालकांनी स्वतः घेतलेली मालमत्ता असेल तर त्याबाबतीत त्यांना लेखी मृत्युपत्राद्वारे कुणाला प्रॉपर्टी हस्तांतरित करायची याबद्दल पालकांना संपूर्ण अधिकार आहे.
परंतु जर दुर्दैवाने मृत्युपत्र नसताना पालकांचे निधन झाले तर मात्र त्यांची मुले त्यांचे पहिले वारसदार ठरतील आणि मालमत्तेवर त्यांचा पहिला हक्क मानला जातो. परंतु जर मुले अल्पवयीन जरी असले तरी ते मालमत्तेचे मालक असतात. परंतु त्या प्रॉपर्टीच्या बाबत ते कायदेशीर व्यवस्थापन करू शकत नाहीत.
त्यामुळे कायदेशीर पालक किंवा न्यायालयाने नियुक्त केलेल्या व्यक्तीला मुल प्रौढ होईपर्यंत अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याकरिता कोर्टात याचिका दाखल करावी लागते.
आई-वडिलांचा घटस्फोट झाला असेल तर मुलांचे काय अधिकार असतात?
समजा आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे तर अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांचा त्यांच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असतो का? हा देखील एक मोठा प्रश्न या निमित्ताने पडतो. त्याचे जर उत्तर बघितले तर आई-वडिलांचा घटस्फोट झाला असला तरी मुलांना त्यांच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असतो.
अशा प्रकरणात संबंधित व्यक्तीच्या धर्मानुसार सामान्य उत्तराधिकार कायदा लागू होतो. वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलाचा हक्क आणि स्व अधिग्रहीत मालमत्तेच्या बाबतीत वडिलांचे कोणतेही मृत्युपत्र न ठेवता निधन झाले तर मुलाचा त्यावर पहिला हक्क मानला जातो. तसेच वडिलांनी मालमत्ता स्वतः खरेदी केली असेल तर वडिलांना लिखित मृत्युपत्राद्वारे त्यांच्या हयातीत आपल्या इच्छेनुसार हवे त्यांना मालमत्ता देता येऊ शकते.
दत्तक मुलांचे काय असतात प्रॉपर्टीवर अधिकार?
त्याचप्रमाणे दत्तक मुलांना देखील पोटाच्या मुलाप्रमाणेच वारसा अधिकार देण्यात आलेला आहे. दत्तक घेतलेल्या मुलांना पालकांच्या मालमत्तेतील वाटा मिळवण्याचा महत्त्वपूर्ण अधिकार आहे व त्यामुळे दत्तक पालकांचा मृत्यू झाल्यास दत्तक घेतलेले मूल देखील इतर मुलांप्रमाणेच मालमत्तेवर दावा करू शकते.