भारतामध्ये जी काही शासकीय कागदपत्रे आहेत त्यामध्ये आधार कार्ड हे एक खूप महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असे सरकारी दस्तऐवज असून शासकीय व इतर कामांकरिता आधार कार्डचा वापर आता केला जातो. अगदी तुम्हाला मोबाईल सिम कार्ड किंवा बँकेचे कुठलेही व्यवहार करायचे असतील तर तुम्हाला आधार क्रमांक अत्यावश्यक आहे.
आधार हा एक बारा अंकी ओळखक्रमांक असून या माध्यमातून विशिष्ट पद्धतीने व्यक्तीची ओळख पटवली जात असते व हे यूआयडीएआय अर्थात युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी केले जाते. परंतु आता गेल्या काही दिवसापासून बघितले तर आधार कार्डचा वापर करून किंवा आधार कार्डच्या संबंधित अनेक फसवणुकीच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडताना आपल्याला दिसून येत आहेत.
अनेक आर्थिक फसवणुकीच्या घटना देखील आधार कार्डचा वापर करून केल्या जात असल्याचे देखील समोर आलेले आपण बघितले असेल किंवा ऐकले असेल. परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी की आधारशी संबंधित गुन्ह्यांसाठी दंड किंवा विशिष्ट शिक्षेची तरतूद देखील आहे. त्यामुळे आधार कार्डशी छेडछाड किंवा इतर काही चुकीचे काम केले तर यामध्ये शिक्षा देखील होऊ शकते.
आधार कार्डशी संबंधित असलेले चुकीच्या गोष्टी किंवा गुन्हे आणि शिक्षा किंवा दंड
1- आधार कार्ड बनवताना जर चुकीची बायोमेट्रिक किंवा डेमोग्राफिक माहिती दिली व त्या माध्यमातून फसवणूक केली तर हा एक गुन्हा असून जर यामध्ये एखादा व्यक्ती दोषी आढळून आला तर त्याला तीन वर्षापर्यंत कारावास किंवा दहा हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
2- एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड वापरून संबंधित व्यक्तीची बायोमेट्रिक माहिती बदलून किंवा बदलण्याचा प्रयत्न करून आधार क्रमांक धारकाच्या ओळखीचे अनुकरण केले तर हा गुन्हा असून याकरिता तीन वर्षापर्यंत कारावास आणि दहा हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो.
3- एखाद्या व्यक्तीच्या रहिवाशाची ओळख माहिती गोळा करण्यासाठी अधिकृत एजन्सी असल्याचे सांगून अशा पद्धतीने माहिती गोळा करणे हा देखील एक गुन्हा आहे. या प्रकरणात जर दोषी आढळले तर तीन वर्षापर्यंत कारावास किंवा दहा हजार रुपये पर्यंतचा दंड किंवा कंपनीला एक लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्याची शक्यता असते.
4- सीआयडीआर अर्थात सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करणे आणि ते हॅक करणे हा देखील गुन्हा आहे. यामध्ये युआयडीएनुसार दहा वर्षापर्यंत तुरुंगवास आणि किमान दहा लाख रूपांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.
5- तसेच केंद्रीय ओळख डेटा भंडारातील जो काही डेटा असतो त्याच्याशी छेडछाड केली तर हा गुन्हा असतो व याकरिता दहा वर्षापर्यंत कारावास किंवा दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा आहे.
6- ऑफलाइन पडताळणी करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या ओळखीच्या माहितीचा गैरवापर केला गेला तर हा देखील गुन्हा असून हा प्रकार एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत घडला असेल तर तीन वर्षापर्यंत कारावास किंवा दहा हजार रुपये पर्यंत दंड किंवा कंपनीच्या बाबतीत असेल तर एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही प्रकारचे शिक्षा होऊ शकते.
7- आधार प्रमाणीकरण किंवा आधार नाव नोंदणी दरम्यान जी काही माहिती किंवा डेटा गोळा केला जातो तो जाणून बुजून एखाद्या अनधिकृत व्यक्तीला पाठवला किंवा तो जाहीर केला किंवा यासंबंधी कायद्याखालील कोणत्याही कराराचे किंवा व्यवस्थेचे उल्लंघन केले
तर हा देखील गुन्हा असून याकरिता तीन वर्षापर्यंत कारावास किंवा दहा हजार पर्यंत दंड होऊ शकतो. यामध्ये जर हा गुन्हा एखाद्या व्यक्तीने केला असेल तर दहा हजार रुपये दंड किंवा कंपनीने केला असेल तर एक लाख किंवा दोन्हींचा समावेश होतो.