वॉशिंग्टन : कोरोना विषाणूचे आतापर्यंत खोकला, ताप आणि श्वसनाचा त्रास ही तीन लक्षणे प्रामुख्याने सांगितली जात होती; परंतु अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्र अर्थात सीडीसीने अजून सहा लक्षणांची माहिती देत लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
सीडीसीच्या वेबसाइटवर करोनाच्या सहा नवीन लक्षणांची यादीच देण्यात आली आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, अमेरिकेतील आरोग्य आणि मानसिक सेवा विभागने सहा नवीन लक्षणांची यादी जाहीर केली आहे.
दिवसेंदिवस प्राणघातक कोरोना विषाणूचे भीषण स्वरूप समोर येत चालले आहे. जगात लाखो लोकांचा बळी घेणारा कोरोना जितक्या वेगाने बदलत जात आहे, तितक्याच वेगाने त्याची लक्षणेदेखील बदलत आहेत.
थंडी, थंडीसोबत शरीरात हुडहुडी भरणे, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि गंध-चवीची जाणीव न होणे ही नवीन लक्षणे आढळल्यास तपासणी करून घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
सुरुवातीला खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होणे, ही कोरोनाची प्रमुख लक्षणे मानली जात होती; पण सीडीसीने यात आणखी ६ नवीन लक्षणांची भर टाकल्याने आता कोरोनाची एकूण ९ लक्षणे झाली आहेत.
त्यामुळे थंडी, थंडीसोबत हुडहुडी भरणे, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि गंध व चवीची जाणीव न होणे यापैकी एकही लक्षण आढळल्यास कोरोनाची शक्यता नाकारता येत नाही.
२ ते १४ दिवसांपर्यंत अशा प्रकारचे लक्षण दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणी करून घेतली पाहिजे. श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत सतत वेदना किंवा दबाव निर्माण होणे, संभ्रम किंवा अशक्तपणा वाटणे आणि ओठ किंवा चेहरा निळा पडू लागणे, यासारखी घातक लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असा सल्ला सीडीसीने दिला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®