file photo

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-  गुजरात विधानसभा निवडणूक अवघ्या एका वर्षावर आली असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाने गुजरातच्या व्यापक हितासाठी घेतलेल्या निर्णयामुळे मी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे, असे रुपाणी यांनी स्पष्ट केले आहे.

गुजरातमध्ये पडद्यामागे नेतृत्व बदलण्याची तयारी सुरू होती,पण भाजप विजय रुपाणी यांना इतक्या लवकर मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय घेईल याची कल्पना कोणालाही नव्हती. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गुजरात मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत निर्णय आज घेण्यात येणार आहे.

विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजप विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अहमदाबाद येथे वर्ल्ड पाटीदार सोसायटीच्या सरदार धामचे उद्घाटन केले तेव्हा गुजरातच्या राजकारणात मोठा बदल घडेल याची कोणालाही कल्पना नव्हती.

भाजपाचे संघटन मंत्री बी एल संतोष गांधीनगर येथे आल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील आणि राज्य प्रभारी रत्नाकर यांची भेट घेतली. थोड्याच वेळात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे राज्यपालांना भेटायला गेल्याची माहिती समोर आली.

त्यानंतर विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजप विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय निरीक्षकांसह विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात. काही केंद्रीय मंत्री गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सहभागी असल्याचेही म्हटले जात आहे.