Marathi News : माणूस जन्माला येतो. शिकतो. नोकरीला लागतो. लग्न करतो. अपत्य जन्माला घालतो. घर घेतो. त्याचे हप्ते फेडण्यात आयुष्य खर्ची घालतो. ते संपताच निवृत्ती येते आणि तो मरतो. साधारणतः जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाची एवढीच कथा.
किंवा एवढे नि असेच आयुष्य. पण फ्लोरिडाचे जॉन आणि मेलडी हेनेसी यांना त्यांची अशी कथा लिहायची नव्हती. त्यांच्या कथेत रोमांच हवा होता. तशी संधी मिळाली नि त्यांनी घरदार सारे काही विकून जगाचा प्रवास सुरू केला. जमिनीपेक्षा पाण्यावर रहाणे खूपच स्वस्त असल्याचे मत त्यांनी अर्धे जग पालथे घातल्यावर व्यक्त केले.
फ्लोरिडात व्यावसायिक असलेले जॉन यांनी २०२० मध्ये व्यवसाय विकला, पाठोपाठ घरही. घरातले किडूकमिडूकही देऊन टाकले. आलेल्या पैशातून त्यांनी स्वतःसाठी जगण्याचे ठरवले.
त्याच वेळी फेसबुकवर जाहिरात आली. ‘कॅरेबियन क्रूझ’ २७४ दिवसांचा प्रवास. त्यांनी या सफरीवर जाण्याचे ठरवले. त्यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण पॅसेफिकचा बराचसा भाग पाहिला आणि सध्या ते डॉमनिकन रिपब्लिकला पोहोचले.
या प्रवासाबद्दल या दाम्पत्याचे म्हणणे असे की, पाण्यावरच्या वास्तव्यात टेलिफोनचे, शिपिंगचे, क्रेडिट कार्डचे बिल एवढेच काय ते असते. घर चालवण्याच्या मोठ्या खर्चातून सुटलो. ना वाहन, ना मालमत्ता. या दोन्ही गोष्टी नाहीत मग त्यांचे मोठे इन्शुरन्सही नाहीत.
तीन ते चार दिवसांचे वास्तव्य ते एका जागी करतात. २०२४ चा त्यांचा प्रवास ठरलेला आहे. ‘व्हिला वे’ या जहाजातून ते प्रवास करणार आहेत. हे जहाज कायमचे निवासस्थान पुरवते.
या जहाजात ३० टक्के प्रवासी कायमचे रहिवासी आहेत. हेनेसीसारखेच अन्नग्लेन, रिचर्ड बुर्ड या दोघांनी घरदार विकून जगाच्या सफरीचा आनंद लुटायला सुरुवात केली आहे.