Marathi News : पत्नीने कोणत्याही पुराव्याशिवाय पतीच्या चारित्र्यावर संशय घेणे हे क्रौर्य आहे, असे मध्य प्रदेशच्या इंदौर येथील कौटुंबिक न्यायालयाने एका खटल्याच्या निकालावेळी नमूद केले. यासोबतच ३८ वर्षीय महिलेची उदरनिर्वाह भत्त्यासाठीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
या महिलेने तिच्या ४२ वर्षीय पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. या संबंधांना विरोध केल्यामुळे पतीने आपला छळ करून घराबाहेर हाकलले, असे तिने याचिकेत म्हटले होते. गेल्या अडीच वर्षांपासून ही महिला पतीपासून विभक्त राहत आहे.
तिने आपल्याला पतीकडून दरमहा २० हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळावा, अशी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. पी. सिंग यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या महिलेची याचिका फेटाळून लावली.
पत्नीने कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय पतीच्या चारित्र्यावर संशय घेणे हे क्रौर्य आहे. याचिकाकर्त्या महिलेने कोणत्याही ठोस कारणाशिवाय पतीचे घर सोडले. त्यामुळे ती उदरनिर्वाह भत्ता मिळवण्यास पात्र नाही, असे न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे या दाम्पत्याची अल्पवयीन अपत्ये पतीकडे आहेत आणि तो त्यांचे पालनपोषण करत आहे, असेही न्यायालय म्हणाले. याचिकाकर्त्या महिलेने पती व सासु-सासऱ्यांवर दोन लाख रुपये हंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात २०२१ साली एका स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
मात्र त्यावेळी महिलेने पतीच्या कथित अवैध संबंधांबाबत कोणताही उल्लेख केला नव्हता. न्यायालयाने आपल्या निकालाच हा मुद्दा अधोरेखित केला. दरम्यान, पतीच्या दाव्यानुसार त्याची पत्नी सोबत राहण्यास तयार नाही. ती सातत्याने आपल्यावर आई-वडिलांना सोडून स्वतंत्र राहण्यासाठी दबाव टाकत होती.
आपली पत्नी शिवणकाम करून दरमहा २० हजार ते २५ हजार रुपये कमावते. ती स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत असल्यामुळे तिला उदरनिर्वाह भत्ता देण्याची गरज नाही, असा युक्तिवाद पतीने केला होता. या दाम्पत्याचे २००७ साली लग्न झाले होते. त्यांना १३ वर्षांचा मुलगा आणि ९ वर्षांची मुलगी आहे. महिलेचा पती इंदौर मनपात कर्मचारी आहे.