स्पेशल

Onion Crop: फक्त ‘हे’ उपाय करा आणि कांद्याचे पीक रोग आणि कीडमुक्त ठेवा! कांद्याचे उत्पादन येईल भरपूर आणि पैसाही मिळेल जोरदार

Published by
Ajay Patil

Onion Crop:- महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड नासिक तसेच अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जास्त प्रमाणात केली जाते. परंतु गेल्या काही वर्षापासून यामध्ये बदल होताना दिसून येत असून जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात कांद्याची लागवड होताना दिसून येत आहे.

साहजिकच इतर पिकांप्रमाणे कांद्यापासून जर भरघोस उत्पादन हवे असेल तर आपल्याला व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारचे प्रयत्न करणे गरजेचे असते.

यामध्ये कांद्यावरील रोग व्यवस्थापन ही बाब खूप महत्त्वाची असते. कांद्यावर अनेक प्रकारचे रोग येतात व त्यांचे व्यवस्थापन वेळीच करणे गरजेचे असते. परंतु कांद्यावर रोग आल्यानंतर व्यवस्थापन करण्यापेक्षा रोग येऊच नये या करता व्यवस्थापन केले तर ते बहुतांशी फायद्याचे ठरते.

या अनुषंगाने या लेखामध्ये आपण  काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. ज्या आपल्याला कांदा पिकाला रोग किंवा कीडमुक्त ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

 हे उपाय करा आणि कांदा पिकाचे रोग किडींपासून बचाव करा

1- हंगामानुसार बघितले तर एखाद्या भागामध्ये जर कांद्याची लागवड होत असेल तर ती एकाच आठवड्यात पूर्ण करावी. यामुळे दोन हंगामामध्ये बराच काळ अंतर ठेवता येते व रोगजंतू किंवा किडींचा जो काही जीवनक्रम असतो त्यामध्ये खंड पाडता येतो किंवा तो तोडता येतो.

2- कांद्यासाठी रोपवाटिका तयार करताना रोपवाटिकेत व शेतामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी हेक्टरी 1.25 किलो पाचशे किलो शेणखतात पंधरा दिवस आधी मिसळून जमिनीत टाकावी.

3- तसेच कांद्याच्या बियाण्याचे निवड करताना ती प्रमाणित बियाण्याची करावी व बीजप्रक्रिया अवश्य करून घ्यावी.

4- तसेच एकच एक पिक न घेता पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे.

5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या जमिनीमध्ये कांद्याची लागवड करायची आहे ती चांगला पाण्याचा निचरा होणारी असावी. ज्या जमिनीतून पाण्याचा निचरा होत नसेल अशा जमिनीमध्ये कांदा लागवड मुळीच करू नये.

6- कांद्याचे पुनर लागवड करण्यापूर्वी दोन तास अगोदर कांद्याच्या रोपांची मुळे एक ग्रॅम कार्बन्डेझिम व दोन मिली कार्बोसल्फान प्रति लिटर पाणी या द्रावणात बुडवून मग लागवड करावी.

7- तसेच रोपांची लागवड ही नेहमी गादीवाफ्यावर करावी.

8- महत्वाचे म्हणजे जेव्हा कांद्यावर फवारणी कराल तेव्हा फवारणी करताना औषधाच्या द्रावणात एक लिटर पाण्यात 0.6 मिली स्टिकर अर्थात चिकट द्रव्याचा उपयोग करावा.

9- फुल किडे व रोगाच्या नियंत्रणांकरिता औषधांची एकत्रितपणे फवारणी करावी.

10- तसेच एकच औषधाचे फवारणी परत परत करू नये. कारण जर एकच प्रकारच्या औषधाची फवारणी केली तर त्या औषधाच्या विरोधात किडींमध्ये प्रतिकारक शक्ती वाढते व अपेक्षित परिणाम आपल्याला दिसून येत नाही. याकरिता फवारणी करताना वेगवेगळे औषधे आलटून पालटून वापरावी.

Ajay Patil