Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. खरेतर, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. हे पैसे जुलै महिन्यापासून दिले जाणार आहेत. म्हणजे या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत.
महत्वाचे म्हणजे या योजनेचे पैसे आता प्रत्यक्षात लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे. या संदर्भात राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत एक्स हँडल वरून आदिती तटकरे यांनी या योजनेचा आतापर्यंत किती महिलांना लाभ मिळाला याची माहिती दिली आहे.
आतापर्यंत किती महिलांना लाभ मिळाला ?
मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स हँडलवर सांगितल्याप्रमाणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून म्हणजे 14 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे.
या योजनेअंतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस ३२ लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्यदिनी पहाटे ४ वाजता ४८ लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग २४ तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे.
आतापर्यंत एकूण ८० लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले असून, सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर कार्यरत आहोत, अशी माहिती दिली आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज गुरुवारी सकाळपर्यंत राज्यातील 80 लाख पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. म्हणजेच पात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत 2400 कोटी रुपये जमा झाले आहेत.
उर्वरित महिलांना कधीपर्यंत मिळणार लाभ?
या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना रक्षाबंधनाच्या आधीच लाभ दिला जाणार आहे. 17 ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये जमा होतील अशी माहिती सरकारने दिली आहे. या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले होते त्या अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांचे अर्ज मंजूर केले गेले आहेत.
आता मंजूर झालेल्या अर्जदार महिलांना या योजनेचे तीन हजार रुपये दिले जात आहेत. ज्या पात्र महिलांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे अशा महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्सफर केली जात आहे.
कशी आहे योजना ?
लाडकी बहीण योजना ही मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरु करण्यात आली आहे. मध्यप्रदेश मध्ये या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा बाराशे रुपये दिले जातात. मात्र महाराष्ट्रात सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत.
म्हणजे एका पात्र महिलेला वार्षिक 18 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ मिळणार आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र ठरतील. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.