लाडकी बहिण योजना महिलांसाठी ठरतेय वरदान ! लाडक्या बहिणींनी सरकारने दिलेल्या पैशांचा केला सदुपयोग, महाराष्ट्रसोबतच ‘या’ राज्यांमध्येही सुरू आहे ही योजना !

या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. अर्थातच पात्र महिलांना दरवर्षी या योजनेतून 18,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यात सुरू झालेल्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे ऑक्टोबर महिन्यातचं ॲडव्हान्स मध्ये जमा करण्यात आले आहेत.

Tejas B Shelar
Published:
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिला सशक्तिकीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने देखील सत्ता स्थापित केल्यापासून महिला सशक्तीकरणाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवून नुकत्याच काही महिन्यांपूर्वी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलीये. ही योजना राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत राज्यातील महिलांना थेट आर्थिक लाभ दिला जातोय.

या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. अर्थातच पात्र महिलांना दरवर्षी या योजनेतून 18,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यात सुरू झालेल्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे ऑक्टोबर महिन्यातचं ॲडव्हान्स मध्ये जमा करण्यात आले आहेत.

तसेच डिसेंबर महिन्याचे पैसे हे देखील ऍडव्हान्स मध्येच महिलांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती आता समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करू असे आश्वासन दिले आहे. अर्थातच, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले तर डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यातच पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

खरे तर, ही योजना सुरू झाल्यापासून चर्चेचा विषय आहे. ही योजना महाराष्ट्रातील महिलांमध्ये फारच कमी दिवसात लोकप्रिय झाली. या योजनेचा राज्यातील कोट्यावधी महिलांनी लाभ घेतलाय. या योजनेला मिळणारी लोकप्रियता पाहता विरोधकांच्या माध्यमातून या योजनेवरून सरकारवर टीका करण्यात आली. ही योजना जास्त दिवस चालणार नाही, या योजनेसाठी सरकार कुठून पैसा आणणार, इतर योजनांचे पैसे हडपून सरकार ही योजना राबवत आहे, असे अनेक आरोप सरकारवर करण्यात आले.

मात्र या आरोपांचा सर्वसामान्य महिलांवर कोणताच परिणाम झाला नाही आणि या योजनेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवलाय. खरे तर या योजनेसाठी शिंदे सरकारने आधीच 46000 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. म्हणजेच पुढील पाच वर्षे ही योजना सुरळीतपणे सुरू राहणार आहे आणि पैशांची कोणतीच अडचण भासणार नाहीये. यामुळे विरोधकांकडून जे काही आरोप केले जात होते ते आरोप साफ खोटे ठरले आहेत.

दरम्यान, आता महायुती सरकारने पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये दिले जातील अशी मोठी घोषणा देखील केली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकार जे की या योजनेच्या विरोधात होते तेही आता आमचे सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ असे म्हणू लागले आहेत.

जे महाविकास आघाडी मधील नेते आधी या योजनेचा विरोध करत होते तेच आता आम्ही महिलांना एक्स्ट्रा पैसे देऊ असे म्हणू लागले असल्याने ही योजना एक गेमचेंजर असल्याचे सिद्ध होत आहे. खरे तर ही योजना बंद पाडण्यासाठी महाविकास आघाडीतील काही नेते कोर्टात सुद्धा गेले होते. मात्र ही योजना सुरळीत सुरू आहे सध्या आचारसंहिता असल्याने या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे मात्र आचारसंहिता संपली की पुन्हा एकदा ही योजना सुरू होणार आहे.

या योजनेबाबत सर्वसामान्य महिलांमध्ये विश्वासहर्ता वाढत आहे. यामुळे आता काही लोकांकडून सोशल मीडियामध्ये अपप्रचार केला जात आहे. या योजनेचा काहीही उपयोग नाही, लोकांचेच पैसे लोकांना दिले यात नवल काय, महागाई वाढली अशी अनेक प्रश्नचिन्हे समाज माध्यमातून तसेच अन्य माध्यमातून उपस्थित केली जात आहेत. या योजनेची बदनामी करण्याचा प्रयत्न सध्या सोशल मीडियामध्ये होतोय.

पण, महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक सरकारे येऊन गेली, काँग्रेसने जवळपास 65 वर्षे देशावर राज्य केले, पण एकाही सरकारला महिलांसाठी अशी योजना आणण्याची बुद्धी सुचलेली नाही. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किसान सन्मान योजना दिमाखात सुरू आहे आणि आता लाडकी बहीण योजना ही भाजपशासित विविध राज्यात अखंडित सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्र ही योजना राबवणारे पहिलेच राज्य नाही.

इतरही राज्यांमध्ये ही योजना सुरू आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून त्या राज्यांमधील महिलांना याचा लाभ मिळतोय. मध्यप्रदेश मध्ये ही योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे. अर्थातच ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष प्रणित सरकार आहे तिथे ही योजना तेथील सरकारने यशस्वीरित्या राबवून दाखवली आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ओडिषा राज्यांमध्ये ही योजना सुरू असून तेथील महिलांना याचा मोठा फायदा होतोय.

खरे तर ही योजना सर्वप्रथम गोव्यामध्ये सुरू झाली. भाजपा प्रणित सरकारने गोव्यात 12 वर्षांपूर्वी ही योजना सुरू केली आणि त्यानंतर देशातील इतर राज्यांमध्ये ही योजना सुरू झाली आहे. म्हणजे जर गोव्यामध्ये बारा वर्षांपासून ही योजना सुरू आहे तर आपल्या महाराष्ट्रातही ही योजना अविरतपणे सुरू राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशांचा महिलांच्या माध्यमातून सदुपयोग होत आहे. महाराष्ट्रातील महिलांना आतापर्यंत या योजनेअंतर्गत साडेसात हजार रुपये देण्यात आले आहेत.

या योजनेच्या माध्यमातून कित्येक गृहिणींना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला आहे. किरकोळ कारणासाठी आता महिलांना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज राहिलेली नाही. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशातून छोटे छोटे स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत आणि त्यातून चांगला नफा देखील मिळवला आहे. अनेक महिलांनी या पैशाच्या माध्यमातून आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिले आहेत. लाडकी बहीण योजनेतून युतीने महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला आहे.

आपल्या हक्काचे पैसे हाती असल्याने कित्यकांना आत्मविश्वास मिळतोय आणि हा आत्मविश्वासच त्यांना नवी उमेद देत आहे. यामुळे ही योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. या योजनेचा महायुती सरकारला मोठा फायदा होणार यात शंकाच नाही. यामुळे महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेसारख्याचं नव्या योजनेची घोषणा आपल्या जाहीरनाम्यात केली आहे. म्हणून आता विधानसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतो, महायुती सरकारला या योजनेचा फायदा होईल का ? हे पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe