स्पेशल

एलआयसीने विद्यार्थ्यांसाठी सुरू केली खास शिष्यवृत्ती योजना! विद्यार्थ्यांना शिक्षणात होईल मोठा फायदा

Published by
Ajay Patil

LIC Scholarship Scheme:- बऱ्याचदा आपण असे अनेक विद्यार्थी बघतो की त्यांच्यामध्ये कौशल्य असते व ते बुद्धिमान देखील असतात. परंतु उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गामध्ये घरची आर्थिक परिस्थिती बऱ्याचदा अडचणीची ठरते. पैशांच्या अभावी इच्छा आणि क्षमता असून देखील विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते व त्यामुळे त्यांचे खूपच नुकसान होते.

याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जाते. अगदी याच पद्धतीने जर आपण भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या दृष्टिकोनातून बघितले तर एलआयसीने देखील एलआयसी गोल्डन ज्युबली स्कॉलरशिप स्कीम 2024 ही शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे

व ही योजना अतिशय फायद्याची असून आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना या योजनेच्या अंतर्गत मदत केली जाणार आहे. एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार जर बघितले तर भारतातील अशा विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा फायदा होणार आहे जे 2021-22,2022-23 किंवा 2023-24 या शैक्षणिक वर्षात किमान 60 टक्के किंवा CGPA ग्रेडसह दहावी,

बारावी तसेच डिप्लोमा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आणि शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये कोणत्याही अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

या योजनेअंतर्गत जर अर्ज करायचा असेल तर त्या अर्जाची अंतिम तारीख 22 डिसेंबर २०२४ आहे व याकरिता ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे.

कसे आहे एलआयसी गोल्डन ज्युबली स्कॉलरशिप स्कीम 2024 चे स्वरूप?
एलआयसीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली ही शिष्यवृत्ती योजना दोन भागांमध्ये विभागली आहे. यातील पहिला भाग जर बघितला तर तो म्हणजे जनरल शिष्यवृत्ती आणि दुसरा भाग म्हणजे मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती असे ते दोन भाग आहेत.

यातील जनरल शिष्यवृत्ती या भागामध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकीत शिक्षण घेणाऱ्या मुलांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसऱ्या भागांमध्ये कोणत्याही सरकारी महाविद्यालयातून व्यवसायिक अभ्यासक्रम आणि आयटीआय डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

दहावीनंतर 10+2 पॅटर्ननुसार इंटरमिजिएट करणाऱ्या किंवा आयटीआय किंवा पॉलिटेक्निक सारखे डिप्लोमा करणाऱ्या मुलींसाठी वेगळी शिष्यवृत्ती या माध्यमातून असणार आहे.

कसा होईल विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा फायदा?
यामध्ये जनरल शिष्यवृत्ती या विभागानुसार वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेणारे निवडक विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला 40 हजार रुपये दिले जातील. तसेच इंजीनियरिंग मध्ये बी टेक वगैरे करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षाला 30 हजार रुपयांची स्कॉलरशिप या माध्यमातून दिली जाईल.

इतकेच नाहीतर ज्या मुलांनी सरकारी कॉलेजमधून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे किंवा सरकारी कॉलेजमधून आयटीआय करत आहेत.अशा विद्यार्थ्यांना जोपर्यंत अभ्यासक्रम चालू असेल तोपर्यंत प्रत्येक वर्षाला 20 हजार रुपये आणि दहा हजार रुपये अशी शिष्यवृत्ती मिळेल.

या अंतर्गत मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यामध्ये दहावी पास झाल्यानंतर विशिष्ट अभ्यासक्रमावर डिप्लोमा किंवा आयटीआय सारखे कोर्स करावे लागणार आहेत. या अंतर्गत मुलींना 15 हजार रुपये दिले जातील व ते दोन वर्षांसाठी साडेसात हजार रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये विभागून दिले जातील.

Ajay Patil