Ahmednagar Love Jihad : संगमनेरमध्ये नुकताच लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस आला. एका अल्पवयीन मुलीला पाच वर्षांपासून धमकावत अत्याचार सुरु होता. बळजबरीने लग्न, धर्मांतर असे प्रकार घडल्याचेही आपल्यासोबत घडल्याचे पिडीतेने फिर्यादीत नमूद केले. त्याविरोधात काही हिंदूत्ववादी संघटनांनी तेथे मोर्चाही काढला. म्हणजेच हा अतिषय गंभीर प्रकारचा गुन्हा होता. मात्र या प्रकरणात दक्षिणेचे खा. निलेश लंके यांनी आरोपींसाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचे वृत्त, काही पोर्टलने प्रसिद्ध केले. या बातम्या राज्यभर व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी खा. लंकेंच्या कार्यालयाने हे खासदाारंविरोधात षडयंत्र असल्याचे पत्रक काढले. तर आपण आज हे नेमके काय प्रकरण आहे, तेच पाहणार आहोत…
संगमनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीने गेल्या आठवड्यात घारगाव पोलिसांत एक तक्रार दिली. ती म्हणते, २०२० पासून शादाब तांबोळी याने मला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. युसूफ चौघुले, कुणाल शिरोळे या मित्रांच्या मदतीने शादाबने माझा अनेकदा पाठलागही केला. अगोदर मैत्री मग प्रेमाचे नाटक असं सगळं झालं. एक दिवस तांबोळी व चौगुले याने आपल्याला गोड बोलून मंचरलं नेलं. तेथून चौगुलेच्या कारमध्ये बसवून, मला चाकणला एका लग्नालाही नेलं. प्रवासात पाण्याच्या बाटलीतून मला गुंगीच औषध दिलं. या दोघांचा कारनामा इथच थांबला नाही तर, मी बेशुद्ध असतानाच मला तेथून दुसऱ्या वाहनाने थेट मुंबईला घेऊन गेले. मुंबईला आयाज पठाण हा चौथा आरोपी भेटला. याच पठाणने मला धमकावत तांबोळीसोबत लाँजवर पाठवलं. हा प्रकार अनेकदा घडला. याच दरम्यान तांबोळीने माझे फोटो व व्हिडीओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत नंतर अनेकदा अत्याचार करण्यात आला. हाच प्रकार वारंवार सुरु असतानाच आपल्यावर लग्नासाठी दबाव टाकला गेला. लग्न आणि धर्मांतर या कागदपत्रांवर आपल्याकडून बळजबरीने सह्या घेण्यात आल्या.
पिडीतेच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी असलेला शादाब तांबोळी, सूत्रधार युसूफ चौगुले, त्यांना मदत करणारे कुणाला शिरोळे, अयाज पठाण यांच्याविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. हा प्रकार उघड झाल्यानंतर वातावरण तापले. बजरंग दलाने घारगावात मोर्चा काढला. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव वाढला. याच प्रकरणात काल काही धक्कादायक बातम्या काही पोर्टलने प्रसिद्ध केल्या. दक्षिणेचे खा. निलेश लंके हे आरोपींना पाठीशी घालत असून मुख्य आरोपी हा शरद पवार गटाचा पदाधिकारी असल्याचा आरोप, या पोर्टलने काही फोटोंसह प्रसिद्ध केला होता. या बातमीसोबत राष्ट्रवादीचे दोन मोठे नेते व त्यांच्यासोबत या घटनेतील मुख्य आरोपीचा एकत्र फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता. या प्रकरणात खा. लंके हे पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे या बातमीत म्हटले होते.
या बातम्यांनंतर खा. लंके यांच्या कार्यालयाने एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यात लंकेंवर करण्यात आलेले सगळे आरोप खोडून काढण्यात आले. प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या निवेदनात लंके यांनी सांगितले की, अशा प्रकरणासंदर्भात माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही. या प्रकरणात कोणी संपर्क केला असता, तरी आपण त्याला पाठीशी घातले नसते. मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला फोन केलेला नाही. केवळ राजकारण म्हणून आपली बदनामी सुरु असल्याचंही लंके यांचं म्हणणं आहे. आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यापुढे ठेऊन राजकीय हेतूनं कोणीतरी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप लंकेंनी केलाय. या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या फोटोबाबतही लंकेंनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, कुणीही कुणासोबतही फोटो काढू शकतं. त्याचा संबंध जोडून बेछूट आरोप करणं चुकीचं आहे.
लंकेंच्या या स्पष्टीकरणानंतर एका स्थानिक कार्यकर्त्यांनेही या पोर्टलवर गुन्हा दाखल केला. घटना घडली. पोर्टललने आरोप केला. लंकेंनी स्पष्टीकरणही दिलं. आता खरी जबाबदारी आहे ती पोलिसांवर… मुख्य घटना, पोर्टलने केलेले आरोप, त्याविरोधात आपली प्रतिमा हनन केल्याचा लंकेंचा आरोप, या तिन्ही प्रकारांचा कसून तपास व्हायला हवा. तपासात अनेक बाबी समोर येतील. लंकेंचे नाव या प्रकरणात का व कसं आलं, हे अद्याप उघड व्हायचे असले तरी, या घटनेने नगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले, हे मात्र नक्की…