स्पेशल

🔴अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघाचे निकाल वाचा एका क्लिकवर ! जाणून घ्या कोण झाले तुमच्या तालुक्याचे आमदार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीने लोकसभा निवडणुकीचा वचपा काढला असून त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीला तब्बल 229 जागा मिळालेल्या आहेत, तर महाविकास आघाडीला 46 आणि इतरांना 13 जागा मिळाल्या आहेत. महायुती मधील भारतीय जनता पक्षाला तब्बल 132 जागा, शिवसेना शिंदे गटाला 56 आणि अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत.

दुसरीकडे महाविकास आघाडी मधील काँग्रेस 16, शिवसेना ठाकरे गटाला 20 आणि शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले होते. मात्र विधानसभेत महायुतीने या साऱ्यांची भरपाई भरून काढली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही महायुतीचे अनेक उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात कोण-कोणते उमेदवार विजयी झालेत याबाबत आढावा घेणार आहोत.

१) अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी विकासकामांच्या जोरावर विजयश्री खेचून आणली व या विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची हॅट्रिक पूर्ण केली आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाचे संग्राम भैय्या जगताप आणि शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्यात लढत झाली. जगताप यांना 1,18,636 आणि कळमकर यांना 79,018 मते मिळालीत. जगतापांनी कळमकर यांचा 39,618 मतांनी पराभव केला.

२) श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह पाचपुते, ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे आणि अपक्ष म्हणून राहुल जगताप निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत पाचपुते यांचा 36,827 मतांनी विजयी झाला. महत्त्वाचे म्हणजे ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यात. पाचपुते यांना 99,005 , जगताप यांना 62,178 आणि नागवडे यांना 53,176 मते मिळालीत.

३) शिर्डी विधानसभा मतदारसंघ : या मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे निकाल लागलाय. महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांचा 70,282 मतांनी पराभव केलाय. विखे पाटील यांना 1,44,778 आणि घोगरे ताईंना 74,496 इतकी मते मिळाली आहेत.म्हणजेच विखे पाटील यांनी घोगरे यांचा 69,828 मतांनी धुव्वा उडवलाय. विखे पाटील यांनी आपला बालेकिल्ला तर शाबूत ठेवलाच आहे, दुसरीकडे आपले कट्टर राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात यांना देखील जोरदार धक्का दिला आहे.

४) संगमनेर विधानसभा मतदारसंघ : येथे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शिंदे गटाचे अमोल धोंडीबा खताळ यांच्यात लढत झाली. खताळ यांनी विखे पाटील यांची रसद घेऊन थेट थोरात यांना चिटपट केले असून ते या संपूर्ण निवडणुकीत एक मोठे जायंट किलर म्हणून उदयास आले आहेत. खताळ यांनी थोरात यांचा 10,560 मतांनी पराभव केला. खताळ यांना एक लाख 12,386 आणि थोरात यांना 1,01,826 एवढे मताधिक्य मिळाले.यावेळेस संगमनेर विधानसभा निवडणूक ही विखे पिता पुत्रांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या ठिकाणाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना तगडी टक्कर देऊ शकेल असा कुठलाही नेता या ठिकाणी मिळत नव्हता. परंतु शिंदे गटाने अमोल खताळ यांना तिकीट दिले आणि याच अमोल खताळ यांनी आज बाळासाहेब थोरात यांना पराभूत केले आहे.

५) कोपरगाव विधानसभा मतदारसंघ : येथे अजित पवार गटाचे आशुतोष काळे आणि शरद पवार गटाचे संदीप वर्पे यांच्यात सरळ लढत झाली. या दोन्ही राष्ट्रवादींच्या लढतीत अजित पवार गटाने बाजी मारली असून काळे यांनी 1,24,624 मतांनी वर्पे यांचा पराभव केलाये. महाराष्ट्रात सर्वाधिक लीड घेऊन आशुतोष काळे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला आहे. काळे हे महाराष्ट्रातून सर्वाधिक लीड घेऊन विजयी झाले आहेत.

६) नेवासा विधानसभा मतदारसंघ : येथे शिंदे गटाचे विठ्ठल वकीलराव लंघे आणि ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांच्यात फाईट झाली. विठ्ठल लंघे यांनी 4,021 मतांनी गडाखांचा पराभव केला. लंघे पाटील यांना 95,444 आणि गडाख यांना 91,423 एवढे मताधिक्य मिळाले.

७) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ : या मतदारसंघात काँग्रेसचे हेमंत ओगले आणि शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांच्यात लढत झाली. या लढतीत हेमंत ओगले यांनी 13,373 मतांनी कांबळे यांचा पराभव केला. ओगले यांना 65,099 आणि कांबळे यांना 52,726 एवढे मताधिक्य मिळाले.

८) अकोले विधानसभा मतदारसंघ : येथे अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे, शरद पवार गटाचे अमित भांगरे आणि अपक्ष म्हणून वैभव पिचड यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीत अजित पवार गटाचे किरण लहामटे यांनी 5,556 मतांनी विजय मिळवला. लहामटे यांना 73,958, भांगरे यांना 68,402 अन पिचड यांना 32,783 एवढे मताधिक्य मिळाले.

९) शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ : येथे भाजपाच्या मोनिका राजळे, शरद पवार गटाचे प्रतापराव ढाकणे आणि अपक्ष म्हणून चंद्रशेखर घुले पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. सध्या स्थितीला या मतदारसंघात मोनिका राजळे आघाडीवर आहेत. 26 व्या फेरीनंतर राजळे ह्या 19,572 मतांनी आघाडीवर असून त्यांच्या विजयाची शक्यता अधिक दिसते. 22 व्या फेरी अखेर राजळे यांना 98,974, ढाकणे यांना 79,402 आणि घुले यांना 57,434 एवढे मताधिक्य मिळाले आहे. ह्या मतदारसंघात देखील मोनिका राजळे यांना विजय निश्चित मानला जात आहे.

१०) राहुरी विधानसभा मतदारसंघ : या मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राजक्त तनपुरे आणि भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले यांच्यात लढत झाली. गेल्या निवडणुकीत तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला होता मात्र ह्या निवडणुकीत आता कर्डीले यांनी मागील पराभवाचा बदला घेतला आहे. भाजपचे शिवाजीराव कर्डीले यांनी 1,35,859 मते मिळवली आहे तर प्राजक्त तनपुरे यांना 1,01,372 मते मिळाली आहे, कर्डीले यांनी माजीमंत्री असलेले तनपुरे यांचा 34,487 मतांनी पराभव केला आहे.

११) कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ :कर्जत जामखेड या हाय प्रोफाईल मतदारसंघात शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे यांच्यात लढत झाली. या ठिकाणी अगदीच चुरशीची लढत झाली अखेर 1243 मतांनी रोहित पवारांचा विजय झाला असून रोहित पवारांना 1,27,676 मते मिळाली असून राम शिंदे यांना 1,26,433 मते मिळाली आहेत.

१२) पारनेर विधानसभा मतदारसंघ : पारनेर विधानसभा मतदारसंघातही यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचे काशिनाथ महादू दाते आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके निवडणुकीच्या रिंगणात होत्या. या ठिकाणी दाते 2,406 मतांनी विजयी झाले आहेत. दाते यांना 1,12,775 आणि राणी लंके यांना 1,10,,369 एवढे मताधिक्य मिळाले आहे. खासदार निलेश लंके यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24