Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या रणधुमाळीत महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने आहेत.
दरम्यान या दोन्ही गटांच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी महायुती सरकारला जड भरली होती.
हेच कारण आहे की विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही गटांकडून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले जात आहे. शेतकरी हिताच्या असंख्य घोषणा दोन्ही गटांकडून दिल्या जातात.
यातीलच प्रमुख घोषणा आहे शेतकरी कर्जमाफीची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्याच प्रचारक सभेत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी मोठी घोषणा केली.
यानंतर महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिला निर्णय हा शेतकरी कर्जमाफीचा घेतला जाईल अशी मोठी घोषणा यावेळी केली.
अशा या परिस्थितीत महाराष्ट्रातील किती शेतकरी बांधव कर्जबाजारी आहेत अर्थातच किती शेतकऱ्यांचे कर्ज थकलेले आहेत त्यांच्यावरील थकबाकीची रक्कम नेमकी किती आहे, कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी कर्जबाजारी आहेत? याबाबत आज आपण सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील किती शेतकरी कर्जबाजारी आहेत
राज्यस्तरीय बँकर्स कमिटी कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एक कोटी 31 लाख शेतकऱ्यांपैकी 15 लाख 46 हजार 379 शेतकरी हे थकबाकीदार आहेत.
या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज थकलेले आहे. या संबंधित थकबाकीदार शेतकऱ्यांकडे विविध बँकांचे तीस हजार 495 कोटी रुपये थकलेली असल्याची माहिती या कमिटीच्या आकडेवारीवरून उघड झाली आहे.
शेतकऱ्यांच्या थकबाकीची सद्यस्थिती नेमकी कशी आहे?
महाराष्ट्रात एक कोटी 31 लाख 34 हजार 819 शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांच्या डोक्यावर दोन लाख 49 हजार 510 कोटी रुपये एवढे कर्ज आहे.
मात्र यातील 15 लाख 46 हजार 379 शेतकऱ्यांची कर्ज थकलेले असून या सदर थकबाकीदार शेतकऱ्यांच्या डोक्यावर तीस हजार 495 कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर आहे. अर्थातच तीस हजार 495 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांकडे थकीत आहे.
सर्वाधिक थकबाकी असणारे महाराष्ट्रातील जिल्हे
जालना जिल्ह्यातील १,३२,३७० शेतकऱ्यांकडे १६३५ कोटी रुपये थकबाकी आहे.
बुलढाणा जिल्ह्यात १,०९,५०२ शेतकऱ्यांकडे १०४८ कोटी रुपये थकबाकी आहे.
परभणी जिल्ह्यातील १,०५,५४७ शेतकऱ्यांकडे ११८० कोटी रुपये थकबाकी आहे.
पुणे जिल्ह्यातील ८९,१३२ शेतकरी हे थकबाकीदार असून या सदर शेतकऱ्यांकडे २३१२ रुपये थकीत आहेत.
नांदेडबाबत बोलायचं झालं तर येथील ८८,५६५ शेतकरी थकबाकीदार असून या शेतकऱ्यांकडे ९०७ कोटी रुपये थकीत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील ८८,३६० शेतकरी थकबाकीदार असून या सदर शेतकऱ्यांकडे १८२७ कोटी रुपये थकलेले आहेत.
वर्धामध्ये ६९,६८६ शेतकरी थकबाकीदार असून या सदर शेतकऱ्यांकडे ८६२ कोटी रुपये थकलेले आहेत.
सोलापूरमधील ६७,३०६ शेतकरी कर्जबाजारी आहेत अन या शेतकऱ्यांकडे २६२६ कोटी रुपये थकलेले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात ३८,५१७ शेतकरी थकबाकीदार असल्याचे आढळले आहे अन या संबंधित थकबाकीदार शेतकऱ्यांकडे ९११ कोटी रुपये थकलेले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील ६३,३८५ शेतकरी थकबाकीदार आहेत अन या सदर शेतकऱ्यांकडे २८५७ कोटी रुपये थकलेले आहेत.
नागपूर जिल्ह्यात ४३,६९७ शेतकरी कर्जबाजारी आहेत अन या शेतकऱ्यांकडे १०१२ कोटी रुपये थकीत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील २३,६६५ शेतकऱ्यांकडे १००१ कोटी रुपये थकीत आहेत.
धुळे जिल्ह्यात ४१,९४६ शेतकऱ्यांकडे ७९४ कोटी, बीडमध्ये ६७,७१० शेतकऱ्यांकडे ११५२ कोटी, छ.संभाजीनगरमध्ये ६६,०४४ शेतकऱ्यांकडे १३८१ कोटी, अमरावतीमधील ६०,६३८ शेतकऱ्यांकडे ९६१ कोटी अन अहिल्यानगरमधील ४८,२८३ शेतकऱ्यांकडे १२८४ कोटी रुपये थकीत आहेत.