Maharashtra Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत जे कर्मचारी रुजू झाले आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन पेन्शन योजनेचा अगदी सुरुवातीपासूनच विरोध केला जात आहे.
ही नवीन योजना शेअर बाजारावर आधारित असून ही योजना निश्चित पेन्शनची हमी देत नाही असा आरोप करत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या नव्या योजनेचा फारच कडाडून विरोध सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांचा हाच विरोध पाहता नवीन सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केलेली आहे. या नवीन सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत जुनी पेन्शन योजनेप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाणार असा दावा सरकारकडून होत आहे.
या सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्विस मधील शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50% एवढी रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार अशी घोषणा सरकारने केली आहे. अजून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. दरम्यान, आता महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे.
खरे तर सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही गटांकडून प्रचार सभांचा झंझावात सुरू आहे. दोन्ही गटातील फायर ब्रँड नेते मोठमोठ्या सभा घेत असून या सभांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. याशिवाय महायुतीने आणि महाविकास आघाडीने सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करत जाहीरनामे देखील काढले आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आता महाविकास आघाडीने देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार अशी ग्वाही दिली आहे. अशा परिस्थितीत आता आपण महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात कोणकोणत्या घोषणा केल्या आहेत याबाबत माहिती पाहणार आहोत.
महाविकास आघाडीचा जाहीरनामा ?
महालक्षी योजनानुसार महिलांना तीन हजार प्रतिमहिना देणार
महिलांसाठी बस प्रवास मोफत करणार
6 गॅस सिलिंडर प्रत्येकी 500 रुपयांत उपलब्ध करून देणार
महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार
महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये 2 दिवसांची ऐच्छिक रजा देणार
जन्मलेल्या प्रत्येत मुलीच्या नावे ठरावीक रक्कम बॅंकेत ठेवणार, 18 वर्षांनंतर लाख रुपये देणार
सुशिक्षित बेरोजगारांना दरमहिना 4 हजार रुपयांपर्यंत भत्ता देणार
शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देणार
नियामित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत सूट देणार
राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती प्रक्रिया सुरु कऱणार
एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसांत निकाल जाहीर करणार
महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर नेणार
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दीड हजारांऐवजी 2 हजार देणार
३०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचे 100 युनिटपर्यंतचे वीजबील माफ करणार
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील याना भारतरत्न देण्याची मागणी करणार
शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढणार
सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करून देणार
राज्यात सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार