Maharashtra Government Scheme : राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून समाजहित जोपासण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा शासनाने विशेष प्रयत्न केले आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून सध्याच्या शिंदे सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एक कौतुकास्पद योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपये मिळणार आहेत.
महाराष्ट्रात याआधीही महिला सक्षमीकरणासाठी काही योजना सुरू झाल्या आहेत. यामध्ये ‘लेक लाडकी’ एक प्रमुख योजना आहे. या योजनेअंतर्गत एक एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना एक लाख रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. हा लाभ संबंधित पात्र मुलींना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.
म्हणजेच या योजनेअंतर्गत एकाचवेळी एक लाख रुपये मिळणार नाहीत. तर पात्र ठरणाऱ्या मुलींना टप्प्याटप्प्याने या योजनेअंतर्गत पैसे दिले जाणार आहेत. अशा परिस्थितीत आता आपण या योजनेची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे योजना?
मुलींचा जन्मदर वाढवणे, स्त्रीभ्रूण हत्येवर लगाम घालणे, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह रोखणे हे प्रमुख उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.
त्यामुळे आगामी काळात पुरोगामी महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या या काळीमा फासणाऱ्या घटना कमी होतील अशी आशा आहे. लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या कुटुंबातील मुलींना एक लाख एक हजार रुपयांची मदत दिली जाते.
मुलीच्या जन्माच्या वेळी पाच हजार रुपये, मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, मुलगी सहावी मध्ये गेली की सात हजार रुपये, मुलगी अकरावीत गेली की आठ हजार रुपये, अन जेव्हा मुलगी अठरा वर्षांची होते तेव्हा तिला 75 हजार रुपये मिळतात. अशा तऱ्हेने मुलीच्या जन्मापासून तर ते अठरा वर्षे होईपर्यंत संबंधित पात्र मुलीला एक लाख एक हजार रुपयांची मदत राज्य सरकारकडून दिली जाणार आहे.
कोणाला मिळणार लाभ
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या कुटुंबातील मुलींनाच दिला जाणार आहे.
पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक असणाऱ्या कुटुंबातील मुलीच या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
एक एप्रिल 2023 नंतर ज्या मुलींचा जन्म झाला आहे त्यांनाच लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे या तारखेच्या आधी ज्या मुली जन्मलेल्या असतील त्यांना याचा लाभ मिळणार नाही.
लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जर एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न यापेक्षा अधिक असेल तर त्या कुटुंबातील मुली यासाठी अपात्र ठरतील.
एका कुटुंबातील दोन मुलींना लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोण कोणती कागदपत्रे लागणार?
लाभार्थीचा जन्मदाखला
कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
आधार कार्ड
पासबुक
रेशन कार्ड
मतदान कार्ड
शाळेचा दाखला
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र