Maharashtra Havaman Andaj : नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता आणि त्यामुळे चक्रीवादळाची निर्मिती झाली. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाला होता. या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज समोर येत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे फक्त अवकाळी पाऊसच नाही तर गारपीटही होणार असा अंदाज आहे. महाराष्ट्रात 26, 27 आणि 28 डिसेंबरला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून 27 तारखेला राज्यातील काही भागांमध्ये गारपिट होणार असाही अंदाज समोर आला आहे.
दरम्यान आता आपण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. 26 डिसेंबर रोजी राज्यातील उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र विभागातीलधुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला असून यां संबंधित जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट देखील जारी केला आहे.
27 डिसेंबर रोजी राज्यातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुणे, नगर, जळगाव, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या चौदा जिल्ह्यांमध्ये 27 तारखेला पावसाची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे या जिल्ह्यांमधील काही भागात गारपीट सुद्धा होईल असा अंदाज आयएमडीने दिलेला आहे. यामुळे या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी जाणकारांनी केले आहे.