Maharashtra New District : महाराष्ट्रात 2014 पासून एकूण 36 जिल्हे अस्तित्वात आहेत. 2014 पूर्वी महाराष्ट्रात फक्त 35 जिल्हे होते. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली अर्थातच एक मे 1960 रोजी महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या फक्त 26 एवढी होती. नंतरच्या काही दशकांच्या काळात टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात दहा जिल्हे तयार झाले आहेत.
महाराष्ट्रातील सध्याच्या जिल्ह्यांचे विभाजन करून आणखी काही नवीन जिल्हे तयार करणे शासन दरबारी प्रस्तावित आहे. पण, या प्रस्तावावर सरकारकडून फारसा सकारात्मक निर्णय होत नसल्याची वास्तविकता आहे. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता हा प्रस्ताव मागे पडून आहे.
अशातच आता गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये एक मॅसेज वेगाने वायरल होत असून यामध्ये महाराष्ट्रात आणखी 21 नवीन जिल्हे तयार होणार असा दावा करण्यात आला आहे. खरे तर राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या असणाऱ्या जिल्ह्यांचे विभाजन व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे.
मध्यंतरी शासनाने याबाबतचा प्रस्ताव सुद्धा तयार केला होता. मात्र या प्रस्तावावर अजून सरकार दरबारी कोणताच निर्णय झालेला नाही. हा प्रस्ताव अजूनही शासनाच्या दरबारात लाल फितीमध्ये अडकून पडलेला आहे. पण अशातच गेल्या काही दिवसांपासून 26 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाकडून एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला जाईल आणि राज्यात नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती होणार असा दावा केला जातोय.
त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यात खरंच 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार का? याबाबत प्रशासकीय पातळीवर काही हालचाली सुरू आहेत का?असे काही प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात गोंधळ घालताना दिसतायेत. अशा परिस्थितीत आज आपण याबाबतची नेमकी सत्यता काय आहे याविषयी माहिती पाहूयात.
व्हायरल पोस्ट नुसार कोणत्या 21 जिल्ह्यांची निर्मिती होणार
व्हायरल पोस्टनुसार, प्रस्तावित नवीन जिल्ह्यांमध्ये जळगावमधील भुसावळ, लातूरमधील उदगीर, बीडमधील अंबेजोगाई, नाशिकमधील मालेगाव आणि कळवण, नांदेडमधील किनवट, ठाण्यातील मीरा-भाईंदर आणि कल्याण, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांतून मिळून माणदेश, बुलढाण्यातील खामगाव, पुण्यातील बारामती, पालघरमधील जव्हार,
अमरावतीमधील अचलपूर, भंडाऱ्यातील साकोली, रत्नागिरीतील मंडणगड, रायगडमधील महाड, अहमदनगरमधील शिर्डी, श्रीरामपूर आणि संगमनेर, गडचिरोलीतील अहेरी आणि यवतमाळमधील पुसद या जिल्ह्यांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. नवीन जिल्हा निर्मितीची घोषणा प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी 2025 रोजी होऊ शकते असा सुद्धा दावा या पोस्टमध्ये होतोय.
खरं काय?
खरेतर, सध्या राज्यात शासनाकडून अनेक विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांसाठी शासन दरबारातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. त्यामुळं आत्तातरी नवीन जिल्ह्यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा जिल्हा न्यायालयाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येण्याची शक्यता आहे.
सध्या शासनाची इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी नसल्याने अद्याप तरी नवीन जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे, जाणकारांचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा निर्मिती बाबतचा प्रस्ताव जर शासन दरबारी विचाराधीन राहिला असता तर या संदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या असत्यात आणि याची माहिती साहजिकच प्रसार माध्यमांमध्ये समोर आली असती.
पण सध्या प्रशासकीय पातळीवर अशा कोणत्याच हालचाली दिसत नाहीयेत. म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. शासन स्तरावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसून राज्यात काही नवीन जिल्हे प्रस्तावित असून त्याबाबतची माहिती विकीपिडीयावर अनेक वर्षांपासून दिलेली आहे. त्यातून ही माहिती उचलून फेक पोस्ट बनवण्यात आली आहे.