………तर शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा विरोध राहणार नाही ! नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग विकसित होणारच ?

Tejas B Shelar
Published:
Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात महाराष्ट्रासहित देशभरातील अनेक राज्यांमध्ये महामार्गाचे जाळे विकसित झाले आहे. रस्त्यांचे नेटवर्क सुधारण्यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

महामार्ग प्रकल्पांची अनेक कामे गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण झाली आहेत तर काही कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. समृद्धी महामार्ग हा असाच एक महामार्ग प्रकल्प असून याचं काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल अशी आशा आहे.

मुंबई ते नागपूर या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर 2022 मध्ये समृद्धीचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला.

यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. यावर्षी म्हणजे 2024 मध्ये या मार्गाचा भरवीर ते ईगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला. अशा तऱ्हेने आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग सर्वसामान्यांसाठी सुरू झाला असून उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा भाग म्हणजेच इगतपुरी ते आमने हा राहिलेला टप्पा येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहे.

दरम्यान सरकारने समृद्धी महामार्गाच्या धरतीवर शक्तिपीठ महामार्ग विकसित करण्याची घोषणा केली आहे. मात्र या महामार्गासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाचा देखील महायुती सरकारला मोठा फटका बसला होता.

यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात आली असल्याची घोषणा केली. पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला जबरदस्त असे बहुमत मिळाले असल्याने पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला गती दिली जाऊ शकते अशा चर्चा सध्या सुरु आहेत.

विशेष बाब अशी की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा महामार्ग करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत अशी भूमिका मांडली आहे. ज्या ठिकाणी या महामार्गाला विरोध आहे त्या कोल्हापुरात या महामार्गासाठी इतर पर्यायी व्यवस्थेची आम्ही चाचपणी करू आणि ज्या ठिकाणी विरोध नाही तेथे याचे काम सुरू करू असे फडणवीस यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

अशातच आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय परिषद सदस्य प्रशांत इंगळे यांनी शक्तिपीठ महामार्ग संदर्भात मोठी मागणी केली आहे. महामार्ग हे विकासाचे मार्ग असून यामुळे विदर्भ, मराठवाड्याचे चित्र बदलणार आहे. शक्तिपीठला विरोध नाही. मात्र, शेतकर्‍यांना समृद्धी महामार्गासारखा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी पिंगळे यांनी यावेळी केली.

शक्तिपीठ महामार्गात गेलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनीला समृद्धी महामार्गासारखा मोबदला दिल्यास शेतकर्‍यांचा विरोध राहणार नाही. समृद्धी महामार्गात शेताच्या रेडिरेकनरच्या पाचपट अर्धरब्बी 7.50 पट व ऊस, केळी, संत्रा, झाडे अशा बारमाही ओलित असलेल्या जमिनींना दहापट मोबदला दिल्या गेला.

त्यातही रेट फिक्सेशन समिती तयार करून शेतकर्‍यांना जास्त मोबदला देण्यात आला. जसे एका शेताचे 8 लाख 75 हजार हेक्टरी रेडिरेकनरचा दर होता ते रेट फिक्सेशन समितीने 11 लाख 92 हजार हेक्टरी काढला व त्याच्या पाचपट, साडेसातपट व दहा पट मोबदला दिला.

त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी देण्यास कोणतीही आडकाठी आणली नाही. यामुळे शक्तिपीठ महामार्गात बाधित होणाऱ्या जमीन धारकांना देखील समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच मोबदला दिला गेला पाहिजे

अशी मागणी यावेळी भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार या संदर्भात काय निर्णय घेणार आणि शक्तीपीठमध्ये बाधित होणारे शेतकरी या संदर्भात काय भूमिका घेतील हे नक्कीच पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe