Maharashtra New Ring Road Project : पश्चिम महाराष्ट्रासहित संपूर्ण राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठी कॉमन बनली आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे राज्यातील अनेक भागांमधील नागरिक अडचणीत आले आहेत. यावर उपाययोजना देखील केल्या जात आहेत. याच उपायोजनांचा एक भाग म्हणून वेगवेगळे रस्ते महामार्ग तयार होत आहेत.
रिंग रोड देखील तयार केले जात आहेत. असाच एक रिंग रोड प्रकल्प सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे तयार होणार आहे. तासगाव शहरात तयार होणाऱ्या या रिंग रोड प्रकल्पासाठी शासनाने नुकतेच 173 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विटा येथे दहिवडी, मायणी ते विटा या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० चे भूमिपूजन सोहळ्या दरम्यान ही मोठी माहिती दिली आहे. गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे तासगाव शहरासाठी बाह्यवळण रस्त्याबाबत तेथील स्थानिक आमदारांनी अनेक वेळा त्यांची भेट घेतली होती.
दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर तासगाव शहरातील सात किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रकल्पासाठी सरकारने 173 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पासाठी सध्या भूसंपादनाचे काम सुरू असून हे काम आगामी काळात पूर्ण होईल आणि त्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होणार आहे.
लोकांनी जर सहकार्य केले तर या रिंग रोडचे काम लवकरच सुरू होणार असा विश्वास यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला आहे. तासगाव शहरात हा रिंग रोड तयार झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि येथील नागरिकांना या निमित्ताने दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.
या कार्यक्रमावेळी नितीन गडकरी यांनी मुंबई ते बेंगलोर व्हाया पुणे असा नवीन महामार्ग तयार केला जाईल अशी घोषणा सुद्धा केली आहे. मुंबईहून निघताना अटल सेतूवरून उतरल्याबरोबर मुंबई ते पुणे महामार्गाला समांतर असा हा द्रुतगती महामार्ग बांधला जाणार अशी माहिती यावेळी गडकरी यांनी दिली.
हा महामार्ग पुणे येथील बाह्य वळण रस्त्याला येऊन तेथून नवीन पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग तयार होणार असे सांगितले गेले आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 60000 कोटी रुपयांचा खर्च होणार असून यापैकी पहिल्या टप्प्यात दहा हजार कोटी रुपयांचे काम केले जाणार आहे. हे काम येत्या महिन्याभरात सुरू होण्याची आशा आहे.
तसेच उर्वरित पन्नास हजार कोटी रुपयांचे काम येत्या सहा महिन्यात सुरु होणार आहे. या महामार्ग प्रकल्पाचा फायदा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील नागरिकांना देखील होणार आहे. कृषी, शिक्षण, पर्यटन, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना या महामार्गाचा फायदा होईल असे मत जाणकारांनी सुद्धा व्यक्त केले आहे.