Maharashtra News : भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा बळीराजा हा कणा आहे. पण आजही उच्चभ्रू समाजात शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच आहे. शेतकरी म्हटलं म्हणजे अडाणी, अशिक्षित, गावठी असा समज समाजात पाहायला मिळतो. मात्र राज्यातील अनेकोनेक शेतकरी बांधवांनी आपल्या कौशल्याच्या आणि कल्पकतेच्या जोरावर शेती व्यवसायात अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे.
राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या जोरावर केवळ शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक काम केल आहे असं नाही तर इतर क्षेत्रातील लोकांना देखील आपल्या कार्याने, प्रयोगाने आणि हुशारीने मार्गदर्शन करण्याचे काम शेतकरी करत आहेत. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला तर आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.
भारतातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजेच युपीएससी उत्तीर्ण करून आयएएस अधिकारी बनत असतात. याच आयएएस अधिकाऱ्यांना मात्र महाराष्ट्रातील एक मराठमोळा शेतकरी मार्गदर्शन करणार आहे. निश्चितच ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी आनंदाची बाब असून यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी मसला येथील प्रयोगशील शेतकरी आणि मातोश्री फार्म चे संचालक रवींद्र मेटकर लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय ऍकॅडमी, मसूरी या ठिकाणी होणाऱ्या आयएएस प्रशिक्षणा दरम्यान आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे प्रशिक्षण 12 डिसेंबर 2022 पासून सुरू झाल असून 12 मे 2023 पर्यंत अविरत सुरू राहणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या विषयांवर संबंधित विषयातील तज्ञ लोकांकडून प्रशिक्षण दिलं जातं.
संबंधित विषयातील मान्यवरांकडून या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन या प्रशिक्षणा दरम्यान मिळत असतं. शेतीविषयक देखील या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे धोरण असून शेतीविषयक प्रशिक्षण देण्यासाठी रवींद्र मेटकर या शेतकऱ्यांची निवड झाली आहे. रवींद्र मेटकर यांनी शेती व शेतीपूरक व्यवसायात आपल्या नावाचा संपूर्ण राज्यभर नवे नवे तर देशभर ठसा उमटवला आहे. यामुळे रवींद्र मेटकरी यांना शेतकरी संवाद : प्रगतशील शेतकऱ्यांकडून शिकवण या विषयावर या अधिकाऱ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
7 मार्च 2023 रोजी हा कार्यक्रम पार पडणार असून मेटकर या अधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणासाठी 184 अधिकारी राहणार आहेत. निश्चितच, शेतकरी आत्महत्या साठी कुख्यात बनलेल्या विदर्भातील एका शेतकऱ्याने 184 आयएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे ही विदर्भासाठी नव्हे-नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.