Maharashtra Railway News : मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुढील महिन्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दाखल होणाऱ्या अनुयायांसाठी विशेष आनंदाची ठरणार आहे.
दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी राजधानी मुंबईत दाखल होतात. यंदा देखील लाखोंच्या संख्येने अनुयायी मुंबईत येणार आहेत. दरम्यान याच लोकांच्या सुविधेसाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलाय.
मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्यांसाठी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान आता आपण या विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कसं राहणार विशेष गाड्यांचे वेळापत्रक?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मध्य रेल्वे नागपूर ते मुंबई दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्या चार, पाच आणि सात डिसेंबरला नागपूरवरून सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१२६२ नागपूर-सीएसएमटी अनारक्षित विशेष ट्रेन नागपूरहून ४ डिसेंबर ला सुटेल या दिवशी ही ट्रेन रात्री ११.५५ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
तसेच ट्रेन क्रमांक ०१२६४ नागपूर-सीएसएमटी ट्रेन ५ डिसेंबर रोजी नागपूरहून सोडली जाणार आहे. या दिवशी ही गाडी सकाळी आठ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
तसेच, ट्रेन क्रमांक ०१२६६ ही विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी दुपारी ३.५० वाजता नागपूर येथून सोडली जाणार आहे. अन ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे.
शिवाय, ट्रेन क्रमांक ०२०४० नागपूर-सीएसएमटी अनारक्षित विशेष ट्रेन ७ डिसेंबरला नागपुर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. या दिवशी ही गाडी नागपूरवरून दुपारी १.२० वाजता रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता सीएसएमटीला पोहोचणार आहे.
विशेष गाड्या कोणत्या स्थानकावर थांबणार
मध्य रेल्वे कडून सोडल्या जाणाऱ्या या विशेष गाड्या या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहेत. या स्पेशल ट्रेन्स अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी आणि दादर या महत्त्वाचा रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.