Maharashtra Successful Farmer : राज्यातील शेतकरी बांधव कायमच आपला वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण देशात आपलं वेगळं पण जपत आहेत. आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असं काम करत आहेत. दरम्यान आता भंडारा जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याचा प्रयोग चक्क अमेरिकेतील लोकांना भुरळ पाडत आहे.
जिल्ह्यातील मौजे बेटाळा या गावातील प्रयोगशील शेतकरी दिलीप ठोंबरे यांनी चक्क एक किलोच एक वांग उत्पादित केलं असून ही वांगी थेट अमेरिकेत गेले आहेत. म्हणून, मराठमोळ्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली वांगी अमेरिकेच्या लोकांना देखील भुरळ पाडू लागले आहेत. वास्तविक वांग्याचे सामान्यपणे वजन साडेतीनशे ग्रॅमच्या आसपास भरते.
मात्र ठोंबरे यांनी असा काही प्रयोग केला आहे की त्यांनी उत्पादित केलेल्या वांग्याचे वजन एक ते दीड किलो इतके भरत आहे. यामुळे सध्या दिलीप रावांची पंचक्रोशीत चर्चा रंगत आहे. दिलीप यांनी उत्पादित केलेली वांगी वजनाला तर वजनदार आहेतच शिवाय चवीच्या बाबतीतही वजनदारच आहेत. हेच कारण आहे की ही वांगी आता पुणे, नागपूर, मुंबई दिल्ली यांसारख्या मेट्रो शहरापुरती मर्यादित राहिली नसून थेट अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय लोकांच्या पसंतीस खरी उतरत आहेत.
दिलीप यांचं गाव हे खरं पाहता भंडारा जिल्ह्यात वाळूसाठी विशेष प्रसिद्ध आहे. मात्र आता दिलीप रावांचा हा प्रयोग या गावाची प्रसिद्धी अजूनच वाढवू पाहत आहे. ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या पाऊण एकरात वांग्याची शेती सुरू केली. दिलीप हे एक प्रयोगशील शेतकरी असून कायमच आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच काहीतरी नवीन आणि भन्नाट प्रयोग करायचा म्हणून त्यांनी वांग्याची शेती सुरू केली. विशेष म्हणजे, त्यांनी पाच प्रकारच्या वांग्याच्या जातीची लागवड मात्र पाऊण एकरात केली.
यामध्ये एक लांब जातीची आणि दुसरी गोल जातीची वांग्याची लागवड करण्यात आली. या जातीच्या वांग्याची विशेषता अशी की, वांगी एक ते दीड किलोपर्यंत वजन देत असतात. विशेष म्हणजे 30 रुपये प्रति किलो दराने आतापर्यंत वांग्याची विक्री त्यांनी केली आहे. यातून त्यांना 40,000 पर्यंतचे उत्पन्न मिळाल आहे. खर्च वजा जाता हे उत्पन्न मिळालं असून आणखी उत्पन्नाची आशा त्यांना आहे.
दिलीप यांनी सांगितले की, त्यांचे नातेवाईक अमेरिकेत वास्तव्यास आहेत. यामुळे, या नातेवाईकांनी देखील ही वांगी अमेरिकेत आपल्या सोबत नेली आहेत. यामुळे ठोंबरे यांनी उत्पादित केलेली वांगी साता समुद्रापार गेली आहेत. ही वांगी चवीला उत्कृष्ट असल्याने बाजारात मोठी मागणी असून यातून त्यांना अजून उत्पन्न मिळणार आहे.