स्पेशल

बुलेट ट्रेनच्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ! महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार भेट

Published by
Tejas B Shelar

Maharashtra Vande Bharat Express News : देशातील पहिली बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन चालवली जाणार असून सध्या या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये बुलेट ट्रेन चा पहिला टप्पा कार्यान्वित होईल आणि यावर बुलेट ट्रेन धावणार असे अपेक्षित होते. सुरत ते बिलीमोरा यादरम्यान 2026 मध्ये बुलेट ट्रेन सुरू होणार अशी आशा होती. या मार्गावर जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकान्सेन बुलेट ट्रेनला चालवले जाणार आहे.

पण बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होत आहे अन म्हणूनचं भारतीय रेल्वे बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवणार असल्याचा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जातोय. एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेने सूत्रांच्या हवाल्यानुसार हा दावा केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टम लेव्हल-२ सिग्नलिंग सिस्टीमसाठी निविदा मागवली आहे. ही यंत्रणा वंदे भारत गाड्यांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद दरम्यान तयार होत असणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गावर बुलेटच्या जागी वंदे भारत ट्रेन चालवली जाऊ शकते असे म्हटले जात आहे.

खरेतर, २०२६ मध्ये म्हणजेच पुढील वर्षी सुरत-बिलिमोरा दरम्यान शिंकान्सेन बुलेट ट्रेन धावणार, असे म्हटले जात होते, परंतु आता ते २०३० पूर्वी शक्य नाही. पुढे ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी आठ वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये झाली होती. 2026 मध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू करून यावर बुलेट ट्रेन चालवणे प्रस्तावित होते.

मात्र बुलेट ट्रेन वेळेत भारतात दाखल होणे शक्य नाहीये, म्हणून यावर वंदे भारत ट्रेन चालवली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. वंदे भारत गाड्या तात्पुरत्या उपाय म्हणून बुलेट ट्रेन मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजतं आहे. यासाठी युरोपियन ट्रेन कंट्रोल सीस्टिम लेव्हल-२ सिग्नलिंग सीस्टिम सुद्धा बसवली जाणार आहे.

महत्त्वाची बाब अशी की नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने सात वर्षांच्या करारासाठी निविदा सुद्धा जारी केली आहे. यामुळे लवकरच मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेनच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावताना दिसू शकते. वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला महाराष्ट्रातून 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.

राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

दरम्यान आता भविष्यात मुंबई ते अहमदाबाद यादरम्यानच्या बुलेट ट्रेनच्या मार्गावर देखील वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. असे झाल्यास मुंबई ते अहमदाबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com