स्पेशल

अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे ठरलं ! असे असतील बारा मतदारसंघात उमेदवार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकाही एकत्र लढणार हे आता स्पष्ट होतंय. शरद पवार गट, ठाकरे गट व काँग्रेसमध्ये विधानसभेच्या जागावाटपासाठी प्राथमिक बैठकाही सुरु झाल्यात. नगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही जागा मविआने जिंकल्या. त्यामुळे सध्या मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय. विद्यमान आमदारांचे बलाबल व पक्षाची ताकद लक्षात घेता नगर जिल्ह्यातील 12 जागांचे ५-४-३ असे जागावाटप होण्याची शक्यता आहे. कोणत्या गटाला किती जागा व संभाव्य उमेदवार कोण, याच विषयाचा अहमदनगर लाईव्ह २४ चा हा स्पेशल रिपोर्ट…

केंद्रात मोदी सरकार आले. मात्र लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. नगर दक्षिणेत निलेश लंके व शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे, हे मविआचे दोन्ही उमेदवार दणदणीत विजयी झाले. एकवेळ महायुतीच्या बाजूने असलेलं वारं, शेवटच्या टप्प्यात फिरलं. पक्षांतर्गत तोडफोडीनंतरची शिवसेना व राष्ट्रवादीची ही पहिलीच निवडणूक. मात्र या निवडणुकीने शरद पवार गट व ठाकरे गटाला नवसंजिवनी दिली. लंके व वाकचौरेंच्या विजयाचे अंतर पाहता, महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते विधानसभेलाही हत्तीच्या बळाने काम करतील, असं दिसतंय. तर दुसरीकडे सहानुभूतीचा टेम्पो कायम ठेवण्यासाठी, मविआ कामाला लागलीय. नगरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, हे पवार गटाचे नेते निलेश लंके व ठाकरे गटाचे नेते शंकरराव गडाख यांना हाताशी धरत, लवकरच व्यूव्हरचना आखण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्हींकडे अशीच स्थिती आहे. जागा वाटपानंतर बंडखोरीची शक्यताही वाढणार आहे. मविाचे जागावाटप कसे होणार, हे पाहण्यासाठी आपल्याला अगोदर विद्यमान आमदार पहावे लागतील. कोणत्या पक्षाची कुठे आणि किती ताकद आहे, हे पहावे लागेल. जिल्ह्यात शरद पवार गटाकडे, राहुरीचे प्राजक्त तनपुरे व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार असे दोन आमदार आहेत. आमदारकीचा राजीनामा देऊन खासदार झालेले निलेश लंकेही शरद पवार गटात आहेत. काँग्रेसकडे संगमनेरचे बाळासाहेब थोरात व श्रीरामपूरचे लहू कानडे अशा दोन आमदारांचे बलाबल आहे. ठाकरे गटाकडे एकही आमदार नसला तरी नेवाशाचे शंकरराव गडाख यांनी सध्या शिवबंधन बांधले आहे. हा सगळा विचार केला तर, मविआकडे फक्त पाच विद्यमान आमदार आहेत.

आता पारनेर वगळता उर्वरीत सहा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाच्या पारंपारिक पक्षाला जागा देण्यात येणार आहे. हे ठरलं नसलं तरी, असंच होण्याची शक्यता आहे. अहमदनगर लाईव्ह 24 च्या अंदाजानुसार राहुरी, कर्जत-जामखेड, पारनेर या हक्काच्या तीन जागांसह शेवगाव-पाथर्डी व अकोला अशा पाच जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. नगर शहर विधानसभेची जागाही शरद पवार गट मागू शकतो. मात्र जागावाटपात एक पाऊल मागे घ्यावे लागते. तेथील ठाकरे गटाची ताकद पाहता, ती जागा त्यांनाच सोडण्याची शक्यता वाटते. ठाकरे गटाला नगर शहरासह, श्रीगोंदा, नेवासा येथील जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला हक्काच्या संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव व राहत्याची जागा दिली जावू शकते. म्हणजेच शरद पवार गट- काँग्रेस- ठाकरे गटाला 5-4-3 असं जागावाटप होऊ शकतं.

यात कोपरगाव व राहाता या दोन्ही जागांत काँग्रेस व ठाकरे गटात जागांची अदलाबदल होऊ शकते. कारण राहत्यात विखेंविरोधात पूर्वापार काँग्रेस जागा लढवत आहे. मात्र तेथे विखेंविरोधात यावेळी प्रभावती घोगरे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांचे ठाकरे गटाशी संबंध पाहता राहत्याची जागा ठाकरे गटाला व कोपरगावची जागा काँग्रेसला जाण्याची शक्यताही आहे. असे झालेच तर थोरातांचे कोल्हे कुटुंबियांशी सध्याचे संबंध पाहता, ऐनवेळी कोल्हेही काँग्रेसची वाट धरण्याची शक्यता वाढते.

मविआचे उमेदवार कोण असतील, ते आपण पाहू…
शरद पवार गटाकडून राहुरीत प्राजक्त तनपुरे, कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार तर पारनेरमध्ये राणीताई लंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. शेवगाव-पाथर्डीत प्रताप ढाकणे यांचेही नाव फायनल समजले जात आहे. फक्त अकोल्यात जर-तरचा खेळ होऊ शकतो. तेथे सुनीता भांगरे किंवा अमित भांगरे यांचे पारडे सध्या जड मानले जात आहे. दुसरीकडे तिरंगी लढत टाळायची असेल, तर शरद पवार हे ऐनवेळी वैभव पिचडांनाही आपल्याकडे घेऊन संधी देऊ शकतात. काँग्रेसकडून संगमनेरमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व श्रीरामपूरात लहू कानडे यांचे तिकीट फिक्स समजले जात आहे.

फक्त राहाता की कोपरगाव..? या जागावाटपाच्या घोळानंतर ते त्यांचा उमेदवार समोर आणतील. आता ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार पाहू. खरंतर ठाकरे गटाला मिळालेल्या जागा वाटपानंतरच बंडखोरांचा ट्विस्ट येणार आहे. कारण ठाकरे गटाला नेवाशासह नगर शहर व श्रीगोंदा अशा तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. नेवाशात ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख हे फिक्स समजले जाताहेत. फक्त श्रीगोंद्याची जागा ठाकरे गटाला गेली, तर तेथे बंडखोरी होण्याची शक्यता जास्त आहे.

श्रीगोंद्यात शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप व काँग्रेसचे घनश्याम शेलार हे इच्छुक आहेत. ठाकरे गटाकडून साजन पाचपुते यांचा दावा राहील. अशावेळी जगताप व शेलार काय करतील, हे पाहणे औत्सुक्याचे राहिल. नगर शहरातही तसेच होण्याची शक्यता आहे. नगर शहरात काँग्रेसचे किरण काळे व शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांची नावे सध्या चर्चेत आहेत. पण ही जागा ठाकरे गटाला गेली तर तेथेही जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम यांची नावे आघाडीवर आहेत.नगर शहर व श्रीगोंद्यातील नाराजी व बंडखोरी मविआच्या नेत्यांची डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे. इतर तालुक्यात मात्र मविआच्या नेत्यांना जास्त त्रास होणार नसल्याचे दिसते.

अहमदनगर लाईव्ह 24