स्पेशल

मोठी बातमी ! मनोज जरांगे पाटील पारनेरमध्ये ‘या’ तारखेला घेणार महासंवाद सभा, मराठा समाज लोकसभेत अधिकाधिक उमेदवारी अर्ज भरणार

Published by
Tejas B Shelar

Manoj Jarange Patil News : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा कळीचा बनला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले आहे. खरेतर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. मात्र मराठा आरक्षणाचे शिल्पकार मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने इतर मागास प्रवर्गातून (कुणबी) मधून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि यासाठी सगेसोयरेची अंमलबजावणी शासनाने केली पाहिजे ही मागणी लावून धरली आहे.

विशेष बाब अशी की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजणार असे चित्र आहे. कारण की, लवकरच मनोज जरांगे पाटील यांची अहमदनगरमधील पारनेर येथे महासंवाद सभा होणार आहे. पारनेर येथील ऐतिहासिक बाजारतळावर 23 मार्च 2024 ला दुपारी बारा वाजता ही महासंवाद सभा घेतली जाणार आहे.

या सभेला आत्तापर्यंत एवढी गर्दी बाजार तळावरील कोणत्याच सभेला जमलेली नसेल एवढी गर्दी जमेल असा दावा या सभेच्या संयोजकांनी केला आहे. दरम्यान याच सभेचे पूर्वनियोजन करण्यासाठी पारनेर तालुका सकल मराठा समाजाची नुकतीच महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे.

या बैठकीत सकल मराठा समाजाने काही निर्णय घेतले आहेत. या बैठकीत आंदोलनाचा एक भाग म्हणून लोकसभेसाठी पारनेर तालुक्यातून अधिकाअधिक मराठा समाजाने उमेदवारी अर्ज भरायचा असा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ही महासंवाद सभा घेण्याचे कारण काय ? या संदर्भात संयोजकांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुंबई मोर्चाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना ओबीसी मधून आरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले होते. सगेसोयरे अधिसूचनेचे प्रारूप देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. याच अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याचे आश्वासन शिंदे यांनी त्यावेळी दिले.

मात्र शासनाकडून अधिवेशन बोलावण्यास टाळाटाळ केली जात होती. विशेष म्हणजे सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर नंतर अधिवेशन घेतले आणि अधिवेशनात नको असलेले दहा टक्के आरक्षण सरकारने लागू केले. यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सकल मराठा समाजाची फसवणूक केली असल्याची भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या फसवणुकी विरुद्ध मनोज जारंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आणि मराठा समाजाने जागोजागी आंदोलन केले म्हणून सरकारने दडपशाहीचा अवलंब केला असा आरोप मराठा समाजाने केला आहे.

मराठा आरक्षणाचे आंदोलन दडपण्यासाठीच सरकारने मराठा आरक्षणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली असल्याचे आरोप यावेळी मराठा समाजाकडून केले गेले आहेत. यामुळे आता सरकारच्या दडपशाही विरोधात सकल मराठा समाजाने एकत्रित येत पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच पार्श्वभूमीवर या महासंवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

खरेतर लोकसभा निवडणुका अगदी बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच पुन्हा एकदा जरांगे पाटील मराठा आरक्षणाची हुंकार भरणार असल्याने या प्रकरणात सरकार काय भूमिका घेणार हे देखील विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान, या महासंवाद सभेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी विविध माध्यमांचा उपयोग केला जाणार आहे.परिणामी या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातून तसेच इतरही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोक या सभेला येतील असे म्हटले जात आहे. यामुळे पारनेर शहराच्या चहुबाजूने वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती यावेळी सकल मराठा समाजाकडून मिळाली आहे. एकंदरीत पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र होणार असे चित्र दिसत आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar