Monsoon News : गेली अनेक दिवस महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारा जवळ अर्थातच नंदुरबार जवळ खिळून बसलेला मान्सून काल अर्थातच 15 ऑक्टोबरला माघारी फिरला आहे. महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून नैऋत्य मान्सून माघारी फिरला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.
दुसरीकडे भारतातील दक्षिणेकडील त्या राज्यांमध्ये ईशान्य मान्सून सक्रिय झाला असून तेथे जोरदार पाऊस सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरला असला तरी देखील राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून समोर आला आहे.
राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात अर्थातच 15 ते 30 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? या कालावधीत राज्यातील कोणत्या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे? या संदर्भात माहिती दिली आहे.
हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे आज 16 ऑक्टोबर आणि उद्या 17 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण विभागात मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच या काळात इतर भागात ढगाळ वातावरण राहणार आहे, अन झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस होईल असा अंदाज आहे.
तसेच 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान कोकणातील मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा विभागातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, विदर्भ विभागातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या 24 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता जाणवत आहे.
मात्र सध्या शेतकऱ्यांची जी शेती कामे सुरू आहेत त्या शेती कामांसाठी या पावसाचा कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीच काळजी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
एकंदरीत महाराष्ट्रातील मान्सूनने काढता पाय घेतला असला तरी देखील राज्यात अजूनही पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. यामुळे या पावसाची शक्यता लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन आखावे, विशेषता फवारणीचे नियोजन करताना या पावसाची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी केले आहे.