802 किमीचा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब महामार्ग ! 6 लेन शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन सुरू, केव्हा होणार भूमिपूजन ?

Tejas B Shelar
Published:
Nagpur Goa Expressway

Nagpur Goa Expressway : महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे तयार होत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान 701 किलोमीटर लांबीच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक देखील सुरू झाली आहे. उर्वरित 76 किलोमीटर लांबीचे काम देखील जुलै 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे. अशातच आता राज्यात आणखी एका महामार्गासाठी भूसंपादन सुरू करण्यात आले आहे.

हा महामार्ग आहे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग. नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हा 802 किलोमीटर लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. या महामार्गाची लांबी समृद्धी महामार्गापेक्षा 101 किलोमीटरने अधिक राहणार आहे. हा महामार्ग राज्यातील अनेक प्रमुख तीर्थक्षेत्रांना कनेक्टिव्हिटी देणार आहे.

या महामार्गाला महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिलेली आहे. तसेच या महामार्गासाठी शासनाने  अधिसूचना सुद्धा जारी केली आहे. यानुसार, हा महामार्ग राज्यातील कोणत्या बारा जिल्ह्यातील कोणत्या गावांमधून आणि कोणत्या गटामधून जाणार आहे हे स्पष्ट झाले आहे. हा मार्ग राज्यातील तीन शक्तीपीठे आणि दोन ज्योतिर्लिंग यांना कनेक्ट करणार आहे.

कोल्हापूर येथील करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेड येथील माहूरची रेणुकादेवी या तीन शक्तिपीठांना हा महामार्ग कनेक्ट करणार आहे. हा मार्ग औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना देखील कनेक्ट करेल. पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेड येथील गुरुगोविंद सिंग महाराज यांचा गुरुद्वारा, सोलापूर शहरातील सिद्ध रामेश्वर मंदिर हे या महामार्गाने जोडले जाणार आहेत.

नागपूर ते गोवा प्रवास फक्त 8 तासात

सध्या स्थितीला नागपूर ते गोवा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना 18 तासांचा कालावधी लागतो. आता मात्र हा प्रवास फक्त आठ तासात पूर्ण होईल असा अंदाज आहे. हा मार्ग राज्यातील वर्धा येथील पवनार पासून सुरू होईल आणि गोवा सीमेलगत असलेल्या सिंधुदुर्ग येथील पत्रादेवीपर्यंत जाणार आहे.

या महामार्गासाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित करण्यात आली असून यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन देखील सुरू करण्यात आले आहे. या मार्गासाठी 8000 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार असून याची प्रक्रिया देखील काही जिल्ह्यात सुरू झाली असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

या महामार्गासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार दराच्या तीन पट अधिक मोबदला दिला जाणार आहे. दरम्यान, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सन 2025 मध्ये या मार्गाचे भूमिपूजन पूर्ण होईल आणि त्यानंतर पाच वर्षांनी अर्थातच 2030 पर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल आणि सर्वसामान्यांसाठी सुरू होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

शक्तीपीठ महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जाणार

या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग म्हणून संबोधले जाणार आहे कारण की हा मार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणारा राहील. हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या मार्गाची वर्धा जिल्ह्यात 36 किलोमीटर एवढी लांबी राहील, यवतमाळ जिल्ह्यात 129 किलोमीटर, हिंगोली जिल्ह्यात 34 किलोमीटर, नांदेड जिल्ह्यात 26 किलोमीटर, परभणी जिल्ह्यात 71 किलोमीटर, बीड जिल्ह्यात 46 किलोमीटर, लातूर जिल्ह्यात 41 किलोमीटर, धाराशिव जिल्ह्यात 43 किलोमीटर, सोलापूर जिल्ह्यात 156 किलोमीटर, सांगली जिल्ह्यात 57 किलोमीटर, कोल्हापूर जिल्ह्यात 123 किलोमीटर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 39 किलोमीटर एवढी या मार्गाची लांबी राहणार आहे.

हा महामार्ग सहा पदरी राहणार असून यावर 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग आणि 26 ठिकाणी इंटरचेंज राहणार आहेत. हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहील आणि यामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत आणखी मजबूत होणार आहे.   

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe