विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. नगर जिल्ह्यातही पडघम वाजू लागले आहेत. भाजपने पहिली यादी जाहीर करत, शिर्डी, कर्जत-जामखेड, राहुरी, शेवगाव-पाथर्डी आणि श्रीगोंदा असे पाच उमेदवार सांगितले. त्यानंतर ठाकरे गटाने यादी जाहीर करत श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे व नेवाशातून शंकरराव गडाखांवर विश्वास दाखवला. इतर पक्षानेही आपल्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या. पण जिल्ह्याचे लक्ष लागलेले दोन मतदारसंघ, मात्र अजूनही महायुतीने गुलदस्त्यातच ठेवले आहेत. त्यात पहिला आहे, संगमनेर आणि दुसरा आहे नेवासा… नेवाशाची जागा महायुतीत यापूर्वी भाजप लढवत होते. तर संगमनेरची जागा शिवसेना लढवत आली आहे. पण यावेळी याच दोघांच्या जागेत अदलाबदल होण्याची शक्यता वाढली आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या दोन्ही जागांबाबत उत्सुकता ताणणार असल्याची चर्चा आहे. संगमनेरची जागा सुजय विखेंसाठी म्हणजेच भाजपसाठी देऊन शिंदे गट त्या बदल्यात नेवाशाची जागा घेईल, असा अंदाज आहे. नेवाशाची जागा शिंदे गटाने घेतली तर उमेदवार कोण..? ज्या उमेदवाराची चर्चा आहे, तो उमेदवार गडाखांना घाम फोडणार का..? काय आहे नेवाशाची गणिते..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न…
गेल्या दोन-चार दिवसांपासून सुजय विखेंचा मूड पाहता ते संगमनेरमधून नक्की लढतील, अशी शक्यता दिसत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी काल थेट मुंबई गाठली. या बातम्याही प्रसारमाध्यमांवर दिवसभर झळकल्या. बाळासाहेब थोरातांचा बदला घ्यायचा, तर तेथे सुजय दादांनीच उमेदवारी करावी, असा आग्रह विखेंच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. विखेंची यंत्रणा, विखेंचा मूड, कार्यकर्त्यांचा आग्रह हे सगळं पाहिल्यावर बाळासाहेब थोरातांना ही निवडणूक सोप्पी नाही, हे लक्षात येतं. आता विषय राहतो, संगमनेरची जागा भाजपला गेली तर शिंदे गटाला त्या बदल्यात काय..? तर शिंदे गटाला नेवाशाची जागा देण्याच्या हालचाली सुरु असल्याच्या बातम्याही येत आहेत. नेवासा मतदारसंघ स्वतंत्र झाल्यापासून येथे शंकरराव गडाख विरुद्ध भाजप अशीच लढत होत आली आहे. पण यंदा नेवासा भाजपमध्ये असलेली सुंदोपसुंदी, आणि एका मोठ्या उद्योजकाची अचानक शिंदे गटात झालेली एन्ट्री पाहता ही जागा शिंदे गटाला जाईल, असं दिसतंय.
आता, नेवाशाच्या राजकारणात एन्ट्री घेणारा हा मोठा उद्योगपती कोण, तर प्रभाकर शिंदे… प्रभाकर शिंदे हे नाव नेवासकरांना नवीन नाही. शिंदे हे गेल्या दहा वर्षांपासून समाजकारणात सक्रीय आहेत. पंचगंगा सिड्सच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले आहेत. एक यशस्वी व दानशूर उद्योजक म्हणून ते नेवाशाला परिचीत आहेत. शिवाय नेवासा तालुक्याला खेटूनच ते वैजापूरमध्ये साखर कारखानाही उभारत आहेत. या कारखान्याचा नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण दोन-दोन सहकारी साखर कारखान्यांशी स्पर्धा करण्यासाठी नेवाशातील शेतकरी खासगी कारखान्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करत होते. आता नेवाशातील शेतकऱ्यांसाठीच हा खासगी कारखाना सुरु करत असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. पंचगंगा सिड्स, साखर कारखाना यामुळे प्रभाकर शिंदे हे कायम नेवासा तालुक्यात चर्चेत असतात. एक प्रसिद्ध उद्योजक व दानशूर व्यक्ती म्हणून प्रभाकर शिंदे ओळखले जातात.
शिवाय प्रभाकर शिंदे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते आरएसएसशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळेच त्यांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्यासाठी तन-मन-धनाने काम केलं होतं. २०१४ साली भाजपच्या मुरकुटेंना निवडून आणण्यात प्रभाकर शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता, असं बोललं जातंय. त्यांचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे. पंचगंगा उद्योगसमूहातून गरजूंना मदत करण्यासाठी त्यांचे वर्षभर काही ना काही उपक्रम सुरु असतात. त्यामुळेच यंदा इतरांना मदत करण्याऐवजी शिंदे काकांनी स्वतः उमेदवारी करावी, असा त्यांच्या कार्यकर्तांचा आग्रह आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. या संबंधातून त्यांना शिंदे गटाची उमेदवारी मिळेल, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
दुसऱ्या बाजूने विचार केला तर नेवासा भाजपात सध्या गटातटाचे राजकारण सुरु आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, युवा नेते ऋषिकेश शेटे, विधानसभा संयोजक सचिन देसरडा ही नावे गडाखांविरोधात चर्चेत असली तरी, या सगळ्या नेत्यांना मर्यादा आहेत. माजी आ. मुरकुटेंवर अनेकदा गडाखांना मॅनेज होणारा भाजपचा नेता, असे आरोपही त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केले आहेत. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत वादात एकाला तिकीट दिले तर दुसरा गट नाराज होण्याची शक्यता आहे. याच शक्यता पडताळून थेट प्रभाकर शिंदे यांना शिंदे गटातून उमेदवारी दिली तर भाजपचे हे सर्व नेते त्यांचं एकदिलाने काम करण्याची शक्यता जास्त आहे. शिंदे यांच्या नावाला, भाजपातून विरोध होईल अशी शक्यता नाही. म्हणूनच ही जागा शिंदे गटाला सोडून तेथून प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी मिळेल, असे चित्र सध्यातरी दिसते. भविष्यात गडाख विरुद्ध शिंदे अशी लढत झाल्यास भाजप, शिंदे गटासह, गडाखांचे नाराज कार्यकर्ते व हिंदूत्ववादी संघटनाही शिंदेंचं काम करतील, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे. असे झाले तर गडाखांनाही ही निवडणूक नक्कीच सोप्पी असणार नाही…