खा. निलेश लंके पुन्हा अजित दादांच्या ताफ्यात येणार ? लंके यांच्या विधानाने नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

लंके हे अजित पवार गटात सामील होत सत्तेत सहभागी होणार अशा चर्चांनी जोर पकडला आहे. लंके यांच्या या विधानामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एक नवीन जोश पाहायला मिळतोय. विधानसभा निवडणुकीत खासदार लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यादेखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

Tejas B Shelar
Published:
Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी ऐनवेळी अजित पवार गटातून उडी घेत शरद पवार यांच्या गटात जात हाती तुतारी घेऊन अचूक टाइमिंग साधले होते.

पण आता पुन्हा एकदा लंके यांच्या याच अचूक टायमिंगची चर्चा होत आहे. खासदार निलेश लंके हे पुन्हा एकदा अजितदादांच्या गटात सामील होणार अशा चर्चांना नगरच्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

या चर्चा सुरू झाल्यात त्या लंके यांच्या एका विधानामुळे. लंके यांनी कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीत येत्या महिन्याभरात गुड न्यूज देणार असे म्हटले होते. तेव्हापासून लंके हे अजित पवार गटात सामील होत सत्तेत सहभागी होणार अशा चर्चांनी जोर पकडला आहे.

लंके यांच्या या विधानामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील एक नवीन जोश पाहायला मिळतोय. विधानसभा निवडणुकीत खासदार लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यादेखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणी लंके यांनी निवडणूक लढवली. मात्र यात त्यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने चिंतन बैठकीचे आयोजन केले होते.

याच बैठकीत खासदार निलेश लंके यांनी येत्या महिन्याभरात गुड न्यूज देणार असे वक्तव्य केले. लंके यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात निलेश लंके हे पुन्हा एकदा अजित पवार गटात सामील होत सत्तेच्या परिघात दिसू शकतात अशा चर्चा सुरू झाल्यात.

दरम्यान, आता याच साऱ्या चर्चांवर खासदार निलेश लंके यांनी स्पष्टीकरण दिले आहे. खासदार निलेश लंके यांनी, ‘मी अजित दादांबरोबर जाणार असल्याचे मलाच प्रसार माध्यमांमधून समजत आहे. मात्र माझा तसा काही विचार नाहीये.

सध्याही तसा विचार नाही आणि भविष्यातही तसा विचार होणार नाही. गेल्या दोन दिवसात मी कोणत्याच नेत्याला भेटलेलो नाही. सध्या मी अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आहे,’ असं म्हणतं लंके यांनी सध्या राजकीय वर्तुळात सुरू असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मात्र असे असले तरी राजकारणात काहीही होऊ शकते यामुळे आगामी काळात निलेश लंके खरंच काही वेगळी भूमिका घेणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe