EPFO 3.0 New Rule:- सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची संस्था जर कोणती असेल तर ती म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना होय. कर्मचाऱ्यांच्या पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंडाचे नियमन आणि व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण काम ईपीएफओच्या माध्यमातून केले जाते.
सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना काही मोठे बदल करण्याच्या तयारीमध्ये दिसून येत असून मिळालेल्या माहितीनुसार ईपीएफओ 3.0 च्या अंतर्गत काही बदल करण्यात येणार आहेत
व त्यातील एक महत्त्वाचा बदल असा असणार आहे की आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफची रक्कम थेट एटीएम मधून काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.साधारणपणे 2025 पासून ही सुविधा कर्मचाऱ्यांना मिळेल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे.
कर्मचाऱ्यांना आता एटीएममधून काढता येईल पीएफ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून आता काही बदल केले जाणार असून ईपीएफओ 3.0 च्या मसुद्यानुसार आता कर्मचाऱ्यांना एटीएम मधून पीएफचे पैसे काढण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा विचार सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
इतकेच नाही तर ही सुविधा कर्मचाऱ्यांना जून 2025 पासून सुरू केली जाईल अशी देखील शक्यता आहे. परंतु एटीएम मधून अशा पद्धतीने रक्कम काढताना ती ठराविकच काढता येणार आहे.म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीमध्येच कर्मचाऱ्यांना पैसे काढता येणार आहेत.
तसेच सेवानिवृत्तीनंतर देखील कर्मचाऱ्यांच्या या पीएफ खात्यात पुरेशी रक्कम राहील याची काळजी या माध्यमातून घेण्यात येणार आहे. याकरिता ईपीएफओ डेबिट कार्डसारखे एक कार्ड आणणार असून या कार्डचा वापर करून एटीएम मधील भविष्य निर्वाह निधी खात्यातून बँक डेबिट कार्ड प्रमाणे पैसे काढता येतील व या कार्डला ईपीएफ विड्रॉल कार्ड म्हटले जाईल.
पीएफची रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक लवचिक व सोपी करण्याची कर्मचारी संघटनांची मागणी होती व त्याउद्देशाने हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.
पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना वाढवता येईल त्यांचे योगदान
केंद्र सरकारने EPS-95 या पेन्शन योजनेत बदल करण्याचा प्रस्ताव देखील तयार केला असून या अंतर्गत कर्मचारी त्यांना सध्या लागू असलेल्या 8.33% योगदान ऐवजी जास्तीचे योगदान देऊ शकतील. परंतु कंपनीच्या योगदानामध्ये कोणताही बदल होणार नसून कंपनीला कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रमाणात योगदान द्यावे लागेल.
या नवीन बदला अंतर्गत कर्मचाऱ्याला कधीही योगदान आणि पेन्शन फंड टॉप करण्याची सुविधा देखील मिळण्याची शक्यता आहे व विचारांमध्ये पीएफ सुविधाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी याकरिता पोर्टल देखील अधिक संवादात्मक केले जाणार आहे.
नोकरी सोडल्यानंतर एका महिन्यानंतर किती पीएफ काढता येतो?
जर आपण पीएफ काढण्याचे नियम बघितले तर त्यामध्ये जर एखाद्या सदस्याची नोकरी गेली तर तो एक महिन्यानंतर त्याच्या पीएफ खात्यात जमा रकमेतून 75% पर्यंत पैसे काढू शकतो व उरलेली 25 टक्क्यांची रक्कम तो नोकरी सोडल्यानंतरच्या दोन महिन्यांनी काढू शकतो.
पीएफ काढण्याचे काय आहेत आयकर नियम?
पीएफ काढण्यासंदर्भात जर आपण इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर विभागाचे नियम बघितले तर त्यानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीमध्ये पाच वर्षे सेवा पूर्ण केली आणि पीएफ काढला तर त्याच्यावर आयकरदायित्व नसते. हा पाच वर्षाचा कालावधी एक किंवा अधिक कंपन्या एकत्र करून देखील असू शकतो.
एकाच कंपनीमध्ये पाच वर्षे पूर्ण करणे आवश्यक नाही. त्यामध्ये फक्त एकूण कालावधी किमान पाच वर्ष असणे अभिप्रेत आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी जर पाच वर्षे सेवेत पूर्ण होण्याअगोदरच पीएफ खात्यातून पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम काढली तर त्याला आयकर नियमानुसार दहा टक्के टीडीएस भरावा लागेल.
अशा परिस्थितीत जर पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला 30 टक्के टीडीएस भरावा लागतो. परंतु जर कर्मचाऱ्याने फॉर्म 15G/ 15H सबमिट केले असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा टीडीएस लागत नाही किंवा टीडीएस कापला जात नाही.