Onion Crop Management : महाराष्ट्रात कांद्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरं पाहता खरीप हंगामात कांद्याची लागवड ही कमी असते मात्र रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो.
रब्बी हंगामातील हवामान कांदा पिकासाठी अधिक पोषक असल्याने दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांना मिळते परिणामी या हंगामात शेतकरी बांधव कांदा लागवडीसाठी अधिक उत्सुक असतात. दरम्यान आता रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी शेतकरी लगबग करत असल्याचे चित्र आहे.
नोव्हेंबर महिन्यातं ज्या शेतकऱ्यांनी कांदा बियाणे पेरले असेल त्या शेतकरी बांधवांची रोपे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाडापासून लागवडीसाठी तयार होत असतात.
जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत रब्बी हंगामातील कांदा लागवड ही चालूच राहते. कृषी तज्ञांच्या मते रब्बी हंगामात कांदा लागवड केल्यास उत्पादीत होणारा कांदा हा अधिक काळ साठवता येतो.
मात्र असे असले तरी, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात वेळेवर कांदा रोप तयार करून लागवड करणे महत्त्वाचे ठरते नाहीतर लागवडीसाठी उशीर झाला तर उत्पादनात घट होण्याची भीती असते. दरम्यान आज आपण रब्बी हंगामातील कांदा लागवड करताना कोणत्या गोष्टींची शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत.
जाणकार लोकांच्या मते, मध्यम ते भारी अन पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी सर्वोत्कृष्ट असते. अशा जमिनीची लागवडीसाठी निवड केल्यास उत्पादनात वाढ होते.
दरम्यान रब्बी हंगामात कांदा लागवड करायची असल्यास जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रोपांची पुनर्लावड करावी.
शेतकऱ्यांनी रोपांची पुनर्लावड करतांना चांगलं कुजलेलं शेणखत वापरावे. हेक्टरी १५ ते २० टन शेणखत वापरलं जाऊ शकते. यामुळे उत्पादनात वाढ होते.
कृषी तज्ञांच्या मते पुनर्लावडसाठी २ मीटर रुंद व ३ ते ४ मीटर लांब वाफे तयार करून लागवड केली तर पिकाची वाढ जोमात होते. कांदा पीक चांगले पोसले जाते आणि उत्पादनात भरीव वाढ होते.
कांद्याच बियाणं पेरून सहा ते आठ आठवडे झाले की असे रोपे पुनर्लावडसाठी वापरावीत. यामुळे रोपाचा विकास जलद गतीने होतो.
या ठिकाणी ठिबक सिंचनाची सोय असल्यास १.२० मीटर रुंदीचे बीबीएफ पद्धतीने वाफे तयार केले पाहिजेत.
कृषी तज्ञ सांगतात की, कांदा लागवड केल्यानंतर अनेकदा कांद्याची रोपे माना टाकतात. यामुळे कांदा पीक वाढीसाठी अडचण येते, परिणामी उत्पादन कमी होते.
यामुळे यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनच लागवड केली पाहिजे. यासाठी गांडूळ खत किंवा कुजलेल्या शेणखतात प्रति गादीवाफा २५ ते ३० ग्रॅम ट्रायकोडर्मा वापरला पाहिजे.
कांदा रोपाची लागवड सपाट व बीबीएफ वाफ्यावर १५ बाय १० सें.मी. अंतरावर करावी, नाहीतर कांदा पिक पोसले जात नाही.
कांद्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश याप्रमाणे खतांचा डोस हा दिला गेला पाहिजे. असं केल्यास शंभर टक्के उत्पादनात वाढ होत असते.
खतांची मात्रा देताना ज्यावेळी कांदा लावला जातो त्यावेळी स्फुरद आणि पालाश पूर्ण डोस द्यावे. पण नत्राची मात्रा अर्धी द्यावी. नत्राची शिल्लक राहिलेली मात्रा लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी देण्याचा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे. दरम्यान खत दिल्यानंतर हलकं पाणी पिकाला देणे उपयुक्त ठरतं. अशा पद्धतीने नियोजन केल्यास कांदा पिकातून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.